| सांगली समाचार वृत्त |
पलूस - दि.३ एप्रिल २०२५
फोरेक्स ट्रेडिंगशी संबंधित गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून एका व्यावसायिकाकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना पलूस पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणातील संशयित अधिकारी महेश बाळासाहेब गायकवाड (वय 36, रा. प्रथमेश अपार्टमेंट, फ्लॅट क्र. 403, तासगाव - कराड रस्ता, पलूस) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
लाच मागणीची पार्श्वभूमी
तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक असून फोरेक्स ट्रेडिंगशी संबंधित व्यवसाय करतात. त्यांच्यावर 5 ऑक्टोबर 2024 रोजी पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 4 जानेवारी 2025 रोजी उपनिरीक्षक महेश गायकवाड यांनी त्यांना ताब्यात घेतले. अटकेची भीती दाखवत तब्बल 10 लाखांची लाच मागितली. त्याच दिवशी तडजोडीनंतर तक्रारदाराने 2 लाख रुपये दिले, त्यानंतर त्यांना अटकपूर्व जामीन घेण्याचा सल्ला देऊन सोडून देण्यात आले. पुढे उच्च न्यायालयातून तक्रारदाराला अटकपूर्व जामीन मंजूर झाला.
उर्वरित लाचेची मागणी आणि कारवाई
या घटनेनंतर गायकवाड यांनी तक्रारदाराशी पुन्हा संपर्क साधत उर्वरित 8 लाख रुपयांची मागणी केली. 25 मार्च रोजी तक्रारदाराला पोलिस ठाण्यात बोलावून "जर पैसे दिले नाहीत, तर तुझी चारचाकी जप्त करेन आणि आणखी एक गुन्हा दाखल करेन" अशी धमकी दिली. त्यामुळे तक्रारदाराने तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.
2 एप्रिल रोजी पलूस पोलिस ठाणे परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी गायकवाड यांनी तडजोड करत तक्रारदाराकडे 2 लाखांची मागणी केली. ही रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलिस पथकाची कारवाई
या कारवाईत पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनायक भिलारे, किशोरकुमार खाडे, रामहरी वाघमोडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील, उमेश जाधव, सलीम मकानदार, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, सीमा माने आणि धनंजय खाडे यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणामुळे पोलिस दलातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला असून पुढील तपास सुरू आहे.