yuva MAharashtra पतसंस्था फेडरेशन शिष्टमंडळास केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांकडून दिलासा !

पतसंस्था फेडरेशन शिष्टमंडळास केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांकडून दिलासा !


केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. पंकजजी चौधरी यांना निवेदन देत असताना महाराष्ट्र राज्य पतसंस्थेचे अध्यक्ष मा. काकासाहेब कोयटे, उपाध्यक्ष शांतीलाल शिंगी, महासचिव शशिकांत राजोबा, संचालक जवाहर छाबडा,मा. धनंजय महाडिक, 
सी. ए. दत्तात्रय खेमनर, व शिवराज मगर
-------------------------------------

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ एप्रिल २०२५

महाराष्ट्रातील नागरी सहकारी, पगारदार सहकारी, महिला सहकारी पतसंस्थांच्या आयकर खात्यासंबंधीत व केंद्र शासनासंबंधीत विषयांवर केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालयांचे राज्यमंत्री मा. पंकजजी चौधरी यांची कोल्हापुरचे खासदार मा. धनंजयराव महाडीक व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचे नेतृत्वाखाली दिल्ली येथे अर्थ मंत्रालयात बैठक झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे महासचिव व सांगली येथील वीराचार्य पतसंस्थेचे मार्गदर्शक संचालक श्री. शशिकांत राजोबा यांनी दिली.

याबाबत बोलतांना श्री. शशिकांत राजोबा म्हणाले की, नागरी सहकारी पतसंस्थांना सेक्शन BOP (2) (a) (i) & 80P (2) (d) OF INCOME TAX ACT 161 या कलमान्वये आयकर माफ असतांना देखील आयकर खात्याकडून काही पतसंस्थांना आयकाराची आकारणी केली जाते. ही आकारणी होऊ नये अशा प्रकारची मागणी करण्यात आली व या विषयांवर आयकर खात्याची सर्वोच्च संस्था असलेली सी.बी.डी.टी. शी चर्चा करुन या बाबतचे सर्क्युलर काढण्याचे मान्य केले आहे. तसेच सेक्शन 80P (2) (a) (i) & 80P (2) (d) OF INCOME TAX ACT 161 नुसार आयकरात माफी आहे तर सहकारी पतसंस्थांनी सहकारी बँकेत केलेल्या गुंतवणुकीवर टि.डी. एस. कापु नये अशा प्रकारची देखील मागणी करण्यात आलेली आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकेत केलेल्या गुंतवणुकीवर देखील टि.डी. एस. कापू नये ही देखील मागणी करण्यात आली आहे. या व्यतिरीक्त SECTION 269 SS 8269T OF THE INCOME TAX ACT 1961 नुसार पतसंस्थांना रु. २०,०००/- चे पुढील रक्कम रोखीने स्विकारता येत नाही व रोखीने देता येत नाही ही अट देखील काढून टाकण्याची मागणी करण्यात आली. तसेच सहकारी पतसंस्थांना पेमेंट गेट वे मध्ये अॅक्सेस मिळावा तसेच सहकारी पतसंस्थांच्या रु.५,००,०००/- पर्यंतच्या ठेवींना बँकांप्रमाणे संरक्षण मिळावे अशा विविध मागण्या या शिष्टमंडळाने केल्या. याबाबत बोलतांना केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालयांचे राज्यमंत्री मा. पंकजजी चौधरी यांनी या सर्व मांगण्या बाबत सहकार मंत्रालयाशी चर्चा करुन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी कोल्हापुरचे खासदार मा. धनंजयराव महाडीक व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचे नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थांचे फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी, महासचिव शशिकांत राजोबा, संचालक जवाहार छाबडा, तसेच राज्य फेडरेशचे कर सल्लागार चार्टर्ड अकौंटंट श्री. दत्तात्रय खेमनर व कोल्हापुर येथील सुप्रसिध्द चार्टर्ड अकौंटंट शिवराज मगर हे उपस्थित होते.

ही भेट घडुन आणण्यासाठी सौ. अरुंधती महाडीक यांनी देखील पुढाकार घेतलेला होता, त्यांना देखील महाराष्ट्रतील सहकारी पतसंस्था चळवळीचे वतीने मनःपुर्वक धन्यवाद देण्यात येत आहेत.