yuva MAharashtra नोकरीचे आमिष दाखवून दोघांची १६ लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल !

नोकरीचे आमिष दाखवून दोघांची १६ लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ एप्रिल २०२५

सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत दोघांकडून तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमोल महादेव आजमाने (मूळ रा. कामेरी, ता. वाळवा; सध्या रा. अक्षर कॉलनी, इस्लामपूर) याच्याविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात फसवणूक व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूर्यकांत बापूसाहेब शिंदे (रा. बिळाशी, ता. शिराळा) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विशाल विष्णू पाटील (बिळाशी) आणि ऋतुजा कुशल पडळकर (लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) यांची या फसवणुकीत फसवणूक झाली आहे. ही घटना ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ दरम्यान घडली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्लामपूर येथील प्रांत कार्यालयात सूर्यकांत शिंदे यांची अमोल आजमाने याच्याशी ओळख झाली. स्वतःला शासकीय बँकेत संपर्क असून अनेकांना नोकरी लावल्याचा दावा त्याने केला. यावर विश्वास ठेवून सूर्यकांत यांनी आपल्या ओळखीतील विशाल व ऋतुजा यांची माहिती व शैक्षणिक कागदपत्रे त्याच्याकडे सुपूर्त केली.

डिसेंबर २०२३ मध्ये दोघांनी मिळून ८० हजार रुपये अमोलला ऑनलाईन पाठवले. त्यानंतर अमोलने त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता झाली असून नियुक्ती प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. काही काळानंतर अमोलने पुढील टप्प्यासाठी प्रत्येकी साडेसात लाख रुपये मागितले. फेब्रुवारी २०२४ मध्ये इस्लामपूरमधील एका हॉटेलमध्ये विशाल व ऋतुजाने मिळून १५ लाख रुपये अमोलकडे दिले.

नोकरीबाबत विचारणा केली असता, अमोल टाळाटाळ करू लागला. त्यामुळे संशय बळावल्याने २१ जून २०२४ रोजी पीडितांनी अमोलच्या कार्यालयात जाऊन पैसे परत मागितले. त्यावेळी वाद निर्माण झाला आणि अमोलने सूर्यकांत यांना जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिली, अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.