yuva MAharashtra अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकर दोषी; शिक्षा ११ एप्रिलला !

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकर दोषी; शिक्षा ११ एप्रिलला !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ एप्रिल २०२५

कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या खून प्रकरणात माजी वरिष्ठ निरीक्षक अभय कुरुंदकरला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्याच्यासोबत गुन्ह्यात सहभागी असलेल्या कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांनाही शिक्षा सुनावण्यात येणार असून, आरोपी राजेश पाटील याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी अंतिम शिक्षा ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता जाहीर होणार आहे.

या प्रकरणात कुरुंदकरला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत खुनाचा दोषी ठरवले असून, भंडारी आणि फळणीकर यांच्यावर पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून कलम २०१ अंतर्गत दोष सिद्ध झाला आहे. मात्र पुराव्याअभावी राजेश पाटील निर्दोष सुटला.

तपासातून उघड झाल्यानुसार, ११ एप्रिल २०१६ रोजी मीरा रोड येथील कुरुंदकरच्या घरी अश्विनी बिद्रे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. मृतदेहाचे तुकडे करून ते वसई खाडीत टाकण्यात आले होते. या क्रूर कृतीत अन्य आरोपींचीही मदत घेतल्याचे समोर आले.

प्रकरणाचा तपास पनवेलच्या सहाय्यक पोलीस उपायुक्त संगीता शिंदे अल्फान्सो यांनी केल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे ॲड. प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. तब्बल ९ वर्षांच्या लढ्यांनंतर अखेर पीडितेला न्याय मिळाला आहे.

दरम्यान, न्यायालयाने निकाल देताना काही गंभीर निरीक्षणे नोंदवली. इतक्या गंभीर आरोपांनंतरही कुरुंदकरची राष्ट्रपती पदकासाठी शिफारस होणे हे धक्कादायक असल्याची तीव्र नाराजी न्यायाधीशांनी व्यक्त केली.

मयत अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे देखील या निकालावेळी न्यायालयात उपस्थित होते. त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा निर्णय न्याय मिळाल्याची भावना निर्माण करणारा ठरला आहे.