yuva MAharashtra सांगलीतील बाल रुग्णांना शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी ठाण्यात जाऊन दिला भावनिक आधार !

सांगलीतील बाल रुग्णांना शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी ठाण्यात जाऊन दिला भावनिक आधार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ एप्रिल २०२५

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची मोहीम हाती घेण्यात आल्यानुसार सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेतून राज्यातील शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांसह किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग,शिक्षण विभाग, आदिवासी विभाग आणि नगर विकास विभागाच्या समन्वयाने ही मोहीम राबवण्यात येत आहे.

सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या सहाय्याने जिल्ह्यातील 29 बालकांच्यावर ठाण्यामधील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये हृदयक शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले असून, या सर्व बाल रुग्णांची सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भेट घेऊन, या बाल रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करून त्यांना भावनिक आधार दिला.

यावेळी त्यांनी हॉस्पिटलसह ऑपरेशन थिएटरची पाहणी करत,डॉक्टरांशी संवाद साधला.यावेळी सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सीईओ डॉ.अमोल गीते, डॉ.भूषण चव्हाण,डॉ.सारंग गायकवाड, हॉस्पिटल मॅनेजर विक्रम कोळेकर, हे उपस्थित होते
      
दरम्यान 29 बाल रुग्णांसह त्यांचे नातेवाईक अशा 47 जणांना मोफत प्रवास,निवास, व भोजन इत्यादींची सोय करण्यात आली आहे. प्रत्येकी 4 लाख रुपयांच्या खर्चाप्रमाणे एकूण 29 जणांच्या शस्त्रक्रियेसाठी 1कोटी 20 लाख रुपये इतका खर्च येणार असून तो सारा खर्च राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, महात्मा फुले जन आरोग्य योजना, दानशूर व्यक्ती, धर्मादाय संस्था यांच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी सांगितले.
     
सांगली ते ठाण्यापर्यंतच्या बाल रुग्णांच्या प्रवासासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उच्च दर्जाच्या बसची मोफत व्यवस्था करून दिल्या बद्दल महेंद्र चंडाळे यांनी परिवहन मंत्र्यांची त्यांच्या ठाण्यामधील कार्यालयात भेट घेऊन आभार मानले. यावेळी सांगली जिल्हा वैद्यकीय मदत कक्षाचे माजी प्रमुख मोहसीन मुल्ला, व सांगली जिल्हा सोशल मीडिया प्रमुख स्वप्निल मस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.