yuva MAharashtra सांगली महापालिका ॲक्शन मोडवर, अडचणीची ठरणारी खोकी हलवणार !

सांगली महापालिका ॲक्शन मोडवर, अडचणीची ठरणारी खोकी हलवणार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ एप्रिल २०२५

सांगली शहरातील रस्ते आणि फूटपाथ अडवणाऱ्या अनधिकृत खोकी व अतिक्रमणावर आता महापालिका कारवाईच्या तयारीत आहे. यासंदर्भात "अ‍ॅक्शन प्लॅन" तयार करण्याच्या सूचना महापालिकेचे प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अलीकडेच शहरातील अनधिकृत खोकींच्या वाढत्या संख्येबाबत विविध वृत्तपत्रांतून वारंवार प्रकाश टाकण्यात आला होता. या परिस्थितीची गंभीर दखल घेत आडसूळ यांनी उपायुक्त व सर्व सहायक आयुक्त यांना खोकींची स्थिती स्पष्ट करणारा तपशीलवार अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या अहवालात कोणत्या ठिकाणी, किती अधिकृत व अनधिकृत खोकी आहेत आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या खोकींची माहिती समाविष्ट असणार आहे.

अहवालानंतर अंमलबजावणीचा टप्पा सुरू केला जाईल. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या किंवा अनधिकृतपणे उभारलेल्या खोकींवर महापालिका कठोर पावले उचलणार असून, या उद्देशाने विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

आयुक्त आडसूळ यांनी स्पष्ट केले की, अधिकृत असलेल्या परंतु अद्याप पुनर्वसन न झालेल्या खोक्यांना योग्य तो पर्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अधिकृत खोक्यांचेही पुनर्वसन आवश्यकतेनुसार केले जाणार आहे. गणेश मार्केटमधील पुनर्वसनाच्या धर्तीवर नवीन योजना राबवण्याचा विचार सुरू असून, त्यासाठी महापालिकेच्या मालकीची जागा शोधली जात आहे.