| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ एप्रिल २०२५
सांगली जिल्हा परिषदेच्या 'उमेद' योजनेअंतर्गत प्रभावी कार्य सुरू असून, महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, महिलांनी तयार केलेल्या वस्तू सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. तसेच बचत गटांनी जिल्ह्याची ओळख ठरेल असे एखादे उत्पादन निवडून त्याचा विशिष्ट ब्रँड विकसित करावा, जेणेकरून तालुका व जिल्हा स्तरावर त्याचे युनिट स्थापन करता येईल.
राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि योजनांचा आढावा घेण्यात आला. या वेळी प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तीन नाविन्यपूर्ण पोर्टलचे लोकार्पण
सांगली जिल्हा परिषदेने उमेद, जटायू आणि वरदान ही तीन पोर्टल्स वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सहकार्याने विकसित केली आहेत. 'उमेद' पोर्टलद्वारे महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले जात आहे. 'जटायू' पोर्टल अमली पदार्थविरोधी मोहिमेशी संबंधित उपक्रमांची माहिती देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे, तर 'वरदान' पोर्टलच्या माध्यमातून विविध विभागांना CSR निधी मिळवण्यात मदत होणार आहे.
तंबाखूमुक्त शाळा जिल्हा: सांगलीची घवघवीत कामगिरी
पालकमंत्री पाटील यांनी सांगली जिल्ह्याला तंबाखूमुक्त शाळा जिल्हा म्हणून घोषित केले. राज्यात जळगावनंतर सांगली हा दुसरा तंबाखूमुक्त जिल्हा ठरला आहे. या उपक्रमासाठी शाळांमध्ये निबंध, पोस्टर, जिंगल आणि लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांमधून जनजागृतीसाठी या माध्यमांचा मोठा उपयोग झाला.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 'दिविजा' योजना
समाजकल्याण विभागाच्या 'दिविजा' योजनेतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार असून, निश्चित कालावधीनंतर त्यावर दुप्पट परतावा मिळणार आहे. केवळ 10 दिवसांत ही योजना अंमलात आणून तिची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
‘माझ्या गावचा धडा’ उपक्रम ठरतोय मार्गदर्शक
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘माझ्या गावचा धडा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना आपल्या परिसराची ओळख करून देण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गाव, तालुका आणि जिल्ह्याशी संबंधित अभ्यासक्रम विकसित करण्यात आले आहेत.
नवीन सुविधा आणि लोकार्पण
कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा परिषद प्रांगणात महिला बचत गटांच्या स्टॉलची पाहणी केली. तसेच हिरकणी कक्ष, बाल संसाधन व विकास केंद्र, अंगणवाड्यांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचेही लोकार्पण त्यांनी केले. या सुविधांमुळे अंगणवाडी सेविकांना थेट संवाद साधता येणार असून, शिक्षण व आरोग्याबाबत मार्गदर्शन मिळू शकणार आहे.
‘नशामुक्त सांगली’साठी जनजागृती
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पुढाकाराने *‘