yuva MAharashtra सांगलीत बायपास रस्त्यावर दुचाकी घसरून महिलेचा दुर्दैवी मृत्यू; गतिरोधक ठरले अपघाताचे कारण !

सांगलीत बायपास रस्त्यावर दुचाकी घसरून महिलेचा दुर्दैवी मृत्यू; गतिरोधक ठरले अपघाताचे कारण !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ एप्रिल २०२५

सांगली शहरातील बायपास रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयाजवळ आज सायंकाळी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका ३३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. उषा आदिनाथ कांबळे (वय ३३, रा. टिंबर एरिया, सांगली) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास त्या दुचाकीवरून बायपास मार्गे जात असताना एका हॉस्पिटलजवळील गतिरोधकावरून त्यांची दुचाकी घसरली. यामुळे त्या रस्त्यावर जोरात आदळून गंभीर जखमी झाल्या. डोक्याला मोठा मार बसल्याने त्या बेशुद्ध पडल्या.

अपघातानंतर काही वेळातच ‘१०८’ रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले.

दरम्यान, या मार्गावर असलेल्या गतिरोधकांवर स्पष्ट पट्टे नसल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. चुकीच्या पद्धतीने बनवलेल्या किंवा योग्य संकेतचिन्हांशिवाय असलेल्या गतिरोधकांमुळे अशा अपघातांची शक्यता वाढत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होती.