yuva MAharashtra सांगली अर्बन बँकेला १५ कोटींचा नफा; आर्थिक स्थिती अधिक भक्कम - अध्यक्ष गणेश गाडगीळ

सांगली अर्बन बँकेला १५ कोटींचा नफा; आर्थिक स्थिती अधिक भक्कम - अध्यक्ष गणेश गाडगीळ


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.३ एप्रिल २०२५

सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने २०२४-२५ आर्थिक वर्षात १५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी दिली. बँकेच्या ठेवींमध्ये ९६ कोटी रुपयांची वाढ होऊन एकूण ठेवी १२७७.१७ कोटींवर पोहोचल्या आहेत, तर कर्जवाटपात ७२ कोटी रुपयांची वाढ होऊन एकूण कर्ज वितरण ७६६.८७ कोटी इतके झाले आहे. यामुळे बँकेचा एकूण व्यवसाय २०४४ कोटी रुपयांवर गेला आहे.

बँकेच्या एन.पी.ए.मध्ये लक्षणीय सुधारणा होऊन निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण केवळ १.१०% इतके राहिले आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार सी.आर.ए.आर.चे किमान प्रमाण १२% आवश्यक असताना, बँकेने १४.७९% पर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

विविध कर्जयोजना आणि व्यवसाय विस्तार

पी.एम. कुसुम योजनेअंतर्गत बँकेने मराठवाड्यातील शाखांमार्फत सोलार फार्मिंगसाठी कर्जवाटप केले आहे. तसेच घरगुती रूफटॉप सोलार प्रकल्पांसाठी विशेष कर्जयोजना राबवली जात आहे. याशिवाय, सोनेतारण, वाहन खरेदी, गृहकर्ज, शेतकरी विशेष कर्ज योजना (एस.यु.बी. किसान), डॉक्टरांसाठी धन्वंतरी योजना आणि छोटे व्यावसायिकांसाठी पिग्मी कर्ज योजना यामुळे कर्जवाटपात मोठी वाढ झाली आहे.

शासकीय योजनांचा लाभ आणि कर्जवसुली धोरण

बँकेच्या कर्जदारांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. यात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी २.०), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, पी.एम. कुसुम योजना, पी.एम. सूर्यघर, राष्ट्रीय पशुधन अभियान (एन.एल.एम.), अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यासारख्या योजनांचा समावेश आहे.

कर्ज वसुलीसाठी विशेष कर्ज मॉनिटरिंग आणि वसुली विभागाने प्रभावी कामगिरी बजावली आहे. बँकेच्या सी.ई.ओ. आणि कर्मचाऱ्यांनी कर्जवसुलीसाठी विशेष प्रयत्न केले.

विमा व्यवसाय आणि ग्राहकहित योजना

बँकेने लाइफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स सेवा सुरू केल्या असून, ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विमा विभागातील कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष योगदान दिले आहे.

भविष्यातील विस्तार आणि नव्या सेवा

बँकेच्या आर्थिक प्रगतीसाठी उपाध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापन समिती आणि संपूर्ण कर्मचारीवर्गाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मजबूत आर्थिक स्थितीमुळे भविष्यात ग्राहकांना लाभांश वाटप, शाखा विस्तार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्याचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी सांगितले.

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, उपाध्यक्ष सी.ए. श्रीपाद खिरे, संचालक एच. वाय. पाटील, शैलेंद्र तेलंग, सतीश मालू, संजय धामणगावकर, संजय पाटील, सी.ए. सागर फडके उपस्थित होते.