| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ एप्रिल २०२५
राष्ट्रवादीचे नेते, माजी महापौर सुरेश आदगोंडा पाटील यांनी सोमवारी सकाळी नेमिनाथनगगर येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने येथील उषःकाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली. या घटनेची प्राथमिक नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या
दप्तरी करण्यात आली आहे. कारण अस्पष्ट आहे.
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सांगलीच्या राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग, व्यापार क्षेत्रातील एक प्रमुख चेहरा असलेल्या सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताने सांगलीकरांना धक्का बसला. काही कारणाने गेल्या वर्षभरापासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून थोडे अलिप्त झाले होते. त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेल्या सूरश्री संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला त्यांनी गेल्या रविवारी हजेरी लावली होती. सोमवारी सकाळी त्यांनी निवासस्थानी साडीने गळफास लावण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. रात्री उशीरा रुग्णालय व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत.