yuva MAharashtra सांगली जिल्ह्याला उत्पन्नाच्या तुलनेत नव्या बसेस मिळाव्यात - शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांची परिवहन मंत्र्याकडे मागणी !

सांगली जिल्ह्याला उत्पन्नाच्या तुलनेत नव्या बसेस मिळाव्यात - शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांची परिवहन मंत्र्याकडे मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.४ एप्रिल २०२५

महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून नुकत्याच सांगली आगारासाठी फक्त पाच बी एस सिक्स या अत्याधुनिक बसेस देण्यात आल्या आहेत. परंतु प्रवासी लोकसंख्येचा आणि उत्पन्नाचा विचार करता सांगली आगारासाठी किमान २०० बसेस देण्यात यायला हव्या होत्या. परंतु तसे होताना दिसत नाही.राज्यात सांगली जिल्ह्याचे परिवहन विभागाचे उत्पन्न हे दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर असतानाही असा दुजाभाव होत आहे असा समज मित्र पक्षाकडून होत असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी नुकतीच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन सांगली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात किमान १०० बसेस देण्याची मागणी केली आहे.
       
दरम्यान इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्याला अत्यंत कमी बसेस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर मित्र पक्षातील आमदारांकडून सांगली बाबत परिवहन विभागाकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप होत असून,तो आरोप खोडून काढण्यासाठी इथून पुढच्या काळात जादा बसेस देण्यात याव्यात अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी दिली आहे.
   
सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते कायमच अग्रेसर आहेत आणि राहतील. त्यामुळे शिवसैनिकांकडून होणाऱ्या विविध मागण्यांकडेही लक्ष देऊन आणि त्या पूर्ण करून शिवसैनिकांचा उत्साह आणि मनोबल वाढवावे. अशी अपेक्षाही जिल्हाप्रमुख चंडाळे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे व्यक्त केली आहे.