yuva MAharashtra पुण्यात नागरिकाचा सतर्कपणा; नियमभंग करणाऱ्या पेट्रोल पंपाला ६० हजारांचा दंड !

पुण्यात नागरिकाचा सतर्कपणा; नियमभंग करणाऱ्या पेट्रोल पंपाला ६० हजारांचा दंड !


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि.३ एप्रिल २०२५

पुण्यातील एका जागरूक नागरिकाच्या सतर्कतेमुळे स्थानिक पेट्रोल पंपाला तब्बल ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कारण होते, तिथे पाणी, हवा आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे. नियमांनुसार, ग्राहकांना या सुविधा विनाशुल्क मिळायलाच हव्यात, मात्र अनेक ठिकाणी याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, पुण्यातील प्रफुल्ल सारडा यांनी याविरोधात ठोस पाऊल उचलत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि योग्य ती कारवाई घडवून आणली.

तक्रारीनंतर दंडाची कारवाई

कोंढवा रोडवरील ईश्वर सर्व्हिस स्टेशन या बीपीसीएल पेट्रोल पंपावर गेल्या काही महिन्यांपासून पिण्यासाठी स्वच्छ पाणी नव्हते, टॉयलेट अस्वच्छ होते आणि गाड्यांसाठी हवा भरण्याची सुविधा पुरवली जात नव्हती. विशेष म्हणजे, हवा भरण्याची जागा खासगी व्यक्तीला भाड्याने देण्यात आली होती, त्यामुळे ग्राहकांना त्यासाठी पैसे द्यावे लागत होते. या गोष्टी लक्षात घेऊन सारडा यांनी बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली.

याबाबत दहा-बारा दिवस सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाचे ऑडिट केले आणि अनियमितता आढळल्याने पंप चालक नितीन ईश्वरलाल चहा यांच्यावर ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज

सारडा यांनी सांगितले की, अशा सुविधा पुरवणे हे प्रत्येक पेट्रोल पंप चालकाचे कर्तव्य आहे. ग्राहकांनी जर कुठेही या नियमांचे उल्लंघन होत असेल, तर तक्रार करून योग्य ती कारवाई घडवून आणावी. जागरूक नागरिकांनी अशा प्रश्नांकडे लक्ष दिल्यास भविष्यात अशा समस्या टाळता येऊ शकतात.

आपल्याला अशा कोणत्याही असुविधेचा अनुभव आला तर संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करा आणि नागरिक म्हणून आपला हक्क बजावा!