| सांगली समाचार वृत्त |
खिद्रापूर - दि.२ एप्रिल २०२५
अलमट्टी धरणातील पाणी नियोजनाच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात वारंवार महापुराची समस्या निर्माण होत आहे. केवळ कायदेशीर लढा पुरेसा नसून, या प्रश्नावर प्रभावी जनआंदोलन उभारण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. या संघर्षात शेतकरी, तरुण आणि महिलांनी पुढाकार घ्यावा, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे त्यांनी सांगितले.
मेधा पाटकर यांनी खिद्रापूर आणि राजापूर (ता. शिरोळ) या महापुराने प्रभावित भागांचा दौरा केला. खिद्रापूर येथे सरपंच सारिका कदम यांच्या निवासस्थानी आयोजित पूरग्रस्तांच्या संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष आण्णाप्पा कुरुंदवाडे, ग्रामपंचायत सदस्य अमित कदम, बसाप्पा पाटील, माजी सरपंच गीता गणेश पाखरे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
आपल्या भाषणात पाटकर म्हणाल्या की, निसर्गाच्या समतोलाशी छेडछाड केल्याने संपूर्ण मानवजातीसमोर संकट उभे ठाकले आहे. विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प राबवले जात असले, तरी स्थानिक नागरिकांचा सहभाग घेतला जात नाही. यावर त्वरित निर्णय घेण्यासाठी शासनाने जनतेशी संवाद साधावा. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातील पाणी व्यवस्थापन करताना केंद्रीय जल आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि महाराष्ट्र सरकारनेही या मुद्द्यावर ठाम भूमिका घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी राजेंद्र सुनके, अमित कदम, रोहिणी कांबळे, जयश्री लडगे, शहिदा शिरगुप्पे, सरताज ढालाईत यांनी महापुरासंदर्भात आपली मते मांडली आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.