yuva MAharashtra घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची झेप – सामान्यांना महागाईचा आणखी फटका !

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची झेप – सामान्यांना महागाईचा आणखी फटका !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ एप्रिल २०२५

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरानंतर आता घरगुती एलपीजी गॅससिलेंडरच्या किमतींमध्येही वाढ झाल्याने सामान्य नागरिकांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली असून ही दरवाढ ८ एप्रिल २०२५च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

या निर्णयामुळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारा सिलेंडर आता ५५० रुपये, तर अन्य ग्राहकांसाठी सिलेंडरचा नवा दर ८५३ रुपये झाला आहे. यापूर्वी बिगर-उज्ज्वला ग्राहकांसाठी गॅस सिलेंडरची किंमत ८०३ रुपये होती.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल कंपन्यांना झालेल्या अंदाजे ४३,००० कोटी रुपयांच्या तोट्याची भरपाई करण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही किंमतवाढ सामान्यांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त ताण आणणारी ठरणार आहे.

गॅस सिलेंडरसह पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे परिणाम होत असतो. त्यामुळे या इंधन दरांचा दरमहा किंवा पंधरवड्याने आढावा घेतला जाऊ शकतो, अशी माहितीही पुरी यांनी दिली. यामुळे येत्या काळात इंधन दरांमध्ये सातत्याने बदल होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले होते. मात्र, आता या योजनेतील लाभार्थ्यांनाही सिलेंडरच्या नव्या दरानुसार ५० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.