yuva MAharashtra महापालिकेचा अभिनव उपक्रम : दर बुधवारी, गुरुवारी नागरिक संवाद व तक्रार निवारण अभियान!

महापालिकेचा अभिनव उपक्रम : दर बुधवारी, गुरुवारी नागरिक संवाद व तक्रार निवारण अभियान!

फोटो सौजन्य  - महापालिका फेसबुक

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२ एप्रिल २०२५

महापालिकेच्या कार्यालयात तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या नागरिकांना अनेकदा अधिकाऱ्यांची अनुपस्थिती किंवा प्रतिसाद न मिळाल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्येच्या सोडवणुकीसाठी प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ यांनी नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे.

यापुढे, दर बुधवारी आणि गुरुवारी सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही ठिकाणी नागरिक संवाद व तक्रार निवारण अभियान राबवले जाणार आहे. या उपक्रमांतर्गत सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी तातडीने ऐकून घेतील आणि त्यावर ठोस उपाय केले जातील.

थेट संवादाद्वारे तक्रार निवारण

मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत या अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना अनेकदा विविध कार्यालयांत जावे लागते, परंतु वरिष्ठ अधिकारी भेटत नसल्याने तक्रारी सुटण्यास विलंब होतो. यावर तोडगा म्हणून या अभियानाद्वारे नागरिकांना थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याची संधी मिळणार आहे.

प्रत्येक तक्रारीची संगणकीय नोंद

या उपक्रमांतर्गत सर्व तक्रारींची डिजिटल पद्धतीने नोंद घेतली जाईल. तक्रार प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा नागरिकांना एसएमएसद्वारे कळवण्यात येईल. गरज असल्यास पत्रव्यवहाराद्वारेही माहिती दिली जाणार आहे.

बैठकींचे वेळापत्रक

दर गुरुवारी दुपारी ३ ते ५ वाजता – सांगली मुख्यालयातील स्थायी समिती सभागृह

दर बुधवारी दुपारी ३ ते ५ वाजता – मिरज विभागीय कार्यालय, मनपा सभागृह कुपवाड

प्रभाग समिती स्तरावर दर बुधवारी दुपारी ३ ते ५ वाजता – नागरिक आपल्या स्थानिक प्रभाग समिती कार्यालयात तक्रारी नोंदवू शकतात.


प्रत्येक ठिकाणी उपायुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहतील.

ऑनलाईन तक्रार प्रणाली लवकरच सुरू

नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी येत्या दोन दिवसांत ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली सुरू केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक जाहीर केला जाईल. WhatsApp वरही तक्रारींची नोंद घेतली जाईल आणि त्यावर उत्तर देण्यात येईल.

हा उपक्रम नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाचा ठरेल आणि महापालिकेच्या प्रशासनास अधिक गतिमान व लोकाभिमुख बनवेल.