yuva MAharashtra पाणीपुरवठ्यात वीज वितरणाचा अडथळा; महापालिका-महावितरण अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन !

पाणीपुरवठ्यात वीज वितरणाचा अडथळा; महापालिका-महावितरण अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ एप्रिल २०२५

शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असून त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पंप बंद पडल्याने नियोजित वेळेप्रमाणे पाणी पोहोचत नाही. परिणामी महापालिकेला नागरिकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पुढील आठवड्यात होणार असून, वीज खंडित होण्याची समस्या कमी करण्यासाठी उपाययोजना ठरवली जाणार आहे.

गेल्या आठवड्यात अचानक आलेल्या पावसामुळे अनेक वेळा वीज खंडित झाली. मंगळवारी दुपारी, तसेच रात्री 7 ते 9.30 या वेळेत वीज गायब होती. बुधवारीही रात्री वीजपुरवठा बंद राहिला. विशेषतः 8 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वाजता वीज गेल्याने पाण्याचा उपसा थांबला आणि त्याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला.

दरम्यान, महापालिकेचे प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या सूचनेनुसार शहरातील सर्व जलकुंभ स्वच्छ करण्याचे काम सुरू असून, ही मोहीम मान्सूनपूर्व तयारीचा एक भाग आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 27 जलकुंभ असून, यापैकी 13 जलकुंभांतील गाळ काढून त्यांची स्वच्छता पूर्ण झाली आहे. उर्वरित 14 जलकुंभ येत्या काही आठवड्यांत स्वच्छ केले जाणार आहेत.

नागरिकांना शुद्ध आणि पर्याप्त पाणी मिळावे यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू असून, अधिकारी जलस्रोत व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.