yuva MAharashtra काँग्रेस पक्षाचे संघटन वाढीसाठी प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार - रामहरी रुपनवर

काँग्रेस पक्षाचे संघटन वाढीसाठी प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार - रामहरी रुपनवर


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.१ एप्रिल २०२५

महाराष्ट्रामध्ये येत्या १५ दिवसात तालुका पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा पदाधिकारी यांच्या समवेत प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी केले. सांगली जिल्हा काँग्रेसची आज काँग्रेस भवन सांगली येथे एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. सुरुवातीस त्यांचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार विक्रम दादा सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. 

यावेळी बोलताना रामहरी रुपनवर पुढे म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे, देशाचे विरोधी पक्षनेते मा. राहुलजी गांधी यांचे आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना मजबूत होण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे नूतन अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ यांनी जिल्हा निरीक्षक नेमलेले आहेत. त्यांनी जिल्ह्यामध्ये जाऊन संघटना बांधणी करावे म्हणून आज मी सांगलीच्या निरीक्षक या नात्याने आपल्या जिल्ह्यात आलो आहे. 

यावेळी स्वागत प्रास्ताविक जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा. डॉ. सिकंदर जमादार यांनी केले यावेळी त्यांनी जिल्ह्यामध्ये लोकसभेला जशी मतदान भाजप विरोधी झाले त्याप्रमाणे विधानसभेला झाली नाही. आता आपल्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे मतदार आहेत त्यांना एकत्रित करून काँग्रेस पक्ष पद्मभूषण वसंतदादा पाटील, डॉ. पतंगरावजी कदम यांच्या काळातील काँग्रेस पक्ष संघटना उभी केली पाहिजे. त्याकरिता आम्ही जिल्हा पदाधिकारी सदरच्या कार्यात एक दिलाने काम करू असे सांगितले. 

यावेळी काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार शेळके, संभाजी राजे पाटील, शिवाजी मोहिते, जिल्हा सरचिटणीस सदाशिव खाडे, जत तालुका अध्यक्ष बाबासाहेब कोडग, वाळवा तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, विजय पवार, महादेव पाटील जत, जिल्हा सचिव सचिन चव्हाण, चैतन्य पाटील, मौलाली वंटमोरे, अरुण पळसुले, निलेश जाधव, शरद चव्हाण, भगवान शिवशरण, अपंग सेलचे सुरेश गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते