yuva MAharashtra सांगली महापालिकेच्या हद्दीत रेडीरेकनर दरात 5.70% वाढ, ग्राहकांवर अतिरिक्त भार !

सांगली महापालिकेच्या हद्दीत रेडीरेकनर दरात 5.70% वाढ, ग्राहकांवर अतिरिक्त भार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२ एप्रिल २०२५

शासनाच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सुधारित वार्षिक मूल्य दर (रेडीरेकनर) प्रकाशित केले आहेत. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका हद्दीत या दरांमध्ये सरासरी 5.70% वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे महापालिकेच्या विकास शुल्कात वाढ होणार असून, त्याचा थेट परिणाम घरांच्या किमतींवर होईल. परिणामी, घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिक खर्च करावा लागणार आहे.

रेडीरेकनर दरातील वाढ व त्याचा प्रभाव

महाराष्ट्र मुद्रांक नियम 1995 अंतर्गत प्रत्येक वर्षी 1 एप्रिल रोजी राज्य सरकारतर्फे नवीन वार्षिक मूल्य दर आणि मूल्यांकन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातात. यावर्षी राज्याच्या ग्रामीण भागात सरासरी 3.36% वाढ, प्रभाव क्षेत्रात 3.29%, नगरपालिका/नगरपंचायती हद्दीत 4.97% वाढ, तर महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई वगळता) 5.95% वाढ करण्यात आली आहे. सांगली महापालिकेच्या हद्दीत हा दर 5.70% ने वाढविण्यात आला आहे.

वाढीमुळे ग्राहकांना दुहेरी आर्थिक फटका

सांगली क्रेडाईचे अध्यक्ष जयराज सगरे यांनी सांगितले की, रेडीरेकनर दर स्थिर ठेवण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली होती. परंतु अपेक्षेपेक्षा अधिक वाढ झाल्याने ग्राहकांवर दुहेरी आर्थिक भार पडणार आहे. आधीच सांगलीच्या विस्तारित भागांमध्ये रेडीरेकनरचे दर बाजारभावाच्या तुलनेत अधिक आहेत. त्यामुळे घर खरेदीसाठी ग्राहकांना जादा खर्च करावा लागत होता. आता या नव्या दरवाढीमुळे मुद्रांक शुल्क तसेच महापालिकेच्या विकास शुल्कात वाढ होईल, परिणामी घरांच्या किंमती आणखी वाढतील.

गृहनिर्माण क्षेत्रातील ही वाढ ग्राहकांसाठी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे संभाव्य खरेदीदारांनी नव्या दरांचा विचार करून आपल्या आर्थिक नियोजनात बदल करणे गरजेचे आहे.