| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ मार्च २०२५
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या प्रवाहात सामील करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शाळा क्रमांक ७, मिरज येथे ‘गुढी पाडवा पट वाढवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ, उप आयुक्त स्मृती पाटील, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात तसेच पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट सुविधा
मनपा शाळांमधील गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रशासन विशेष प्रयत्न करत आहे. या शाळांमध्ये आधुनिक सुविधा, ई-लर्निंग, मोफत स्कूल बस आणि विविध उपक्रम राबवले जात असून त्यामुळे पालकांचा विश्वास वाढला आहे. प्रभारी आयुक्त अडसूळ यांनी सांगितले की, "महानगरपालिका शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अधिक प्रयत्न करावेत."
वाढती विद्यार्थ्यांची संख्या
सदर शाळा सन २०२२ मध्ये स्थापन झाली असून सध्या २७७ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. गुढी पाडव्याच्या निमित्ताने इयत्ता पहिलीत ५५ नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर बालवाडीत १८० मुलांनी नावनोंदणी केली. त्यामुळे एकूण पटसंख्या ३८५ वर पोहोचली असून जूनपर्यंत ती ४०० हून अधिक होण्याची अपेक्षा आहे.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पालकांनीही शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि महानगरपालिकेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.