| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ मार्च २०२५
सांगलीत राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी निषेध नोंदवला. संघटनेच्या वतीने काळी गुढी उभारून सरकारच्या भूमिकेचा विरोध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि त्यांच्या जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख होता. मात्र सत्ता मिळाल्यानंतर हे आश्वासन पाळले गेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात कर्जमाफी शक्य नसल्याचे स्पष्ट करत शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचा सल्ला दिला. ही शेतकऱ्यांची फसवणूक असून त्याविरोधात आम्ही आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले.
या आंदोलनात भरत चौगुले, प्रकाश मिरजकर, अजित हळिंगळे, तानाजी चव्हाण, संजय बेले, संदीप राजोबा, सर्जेराव पवार, बाबासो संदे, आप्पासाहेब पाटील, बाबासाहेब पाचोरे, शशिकांत पाटील, विजयकुमार पाटील आणि सुरेश पचिंब्रे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.