| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ मार्च २०२५
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील मॉडर्न बेकरीजवळ एका मोपेडला आग लागल्याची घटना सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडली. महेश खोत (रा. रामनगर) हे कांदे-बटाटे घेऊन सांगलीत येत असताना त्यांच्या मोपेडवरील पोत्याला अचानक आग लागली.
धूर येऊ लागल्याचे लक्षात येताच खोत यांनी मोपेड थांबवली, मात्र काही क्षणातच आग वाढली आणि टायरसह संपूर्ण मोपेडने पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, तसेच तत्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. काही मिनिटांतच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग नियंत्रणात आणली.
या घटनेमुळे रस्त्यावर कांदे विखुरले होते आणि मोपेडचा मोठा भाग जळून खाक झाला. अनेक नागरिकांनी ही घटना मोबाईलवर चित्रीत केली. आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, गरम झालेले इंजिन आणि पोत्याच्या धाग्यांमुळे आग लागल्याची चर्चा परिसरात होती.