| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ फेब्रुवारी २०२५
जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी सहकार भारती, सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशन आणि सांगली जिल्हा नागरी बँक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. हे शिबीर कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या सौजन्याने सांगली येथील दैवज्ञ भवन येथे पार पडले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदयराव जोशी उपस्थित होते. नुकतीच त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यासोबतच बुलढाणा अर्बन सोसायटीचे सीईओ श्री. शिरीप देशपांडे यांचा सहकार भारतीच्या राष्ट्रीय पतसंस्था प्रकोष्ठ पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात डॉ. जोशी यांनी सहकार क्षेत्रातील संधी आणि सरकारच्या सहकार धोरणांवर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की, केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयामुळे पतसंस्थांसमोरील अडचणी सोडविण्यास मदत होईल. सक्तीचे विलीनीकरण टाळले जाईल आणि नव्या संस्थांच्या विस्ताराला चालना दिली जाईल. तसेच, पतसंस्थांना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी कर्मवीर पतसंस्थेने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सुचविले.
यावेळी रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची जैन आर्थिक विकास मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दलही त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रशिक्षण सत्रे आणि तज्ज्ञ मार्गदर्शन
शिबीराच्या पहिल्या सत्रात सीए अमित शिंत्रे यांनी "इनकम टॅक्स कायदा" या विषयावर मार्गदर्शन केले, तर दुसऱ्या सत्रात डॉ. राजन पडवळ यांनी "स्टॅटेजिक मॅनेजमेंट" या विषयावर महत्वपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला सांगली अर्बन बँकेचे चेअरमन गणेशराव गाडगीळ, सांगली जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर जाधव, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ए. डी. पाटील, उपाध्यक्ष डॉ. सिध्दनाथ महाडीक, प्रदेश पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख सागर चौगुले, सांगली महानगर अध्यक्ष शशिकांत राजोबा, महिला बँक प्रकोष्ठ अध्यक्षा सौ. वर्षाताई आवाडे, सांगली ग्रामीण अध्यक्ष सुमंत महाजन, सांगली महानगर महामंत्री शैलेश पवार, कर्मवीर पतसंस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. अशोक सकळे आणि डॉ. नरेंद्र खाडे यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सांगलीतील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी अशा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.