| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ फेब्रुवारी २०२५
सांगली जिल्ह्यातील वाढत्या नशाखोरीला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या व्यवहारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आला आहे.
या टास्क फोर्समध्ये पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक आणि अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त हे पाच वरिष्ठ अधिकारी असणार आहेत. दर सोमवारी या टास्क फोर्सच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा!
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय आमदारांनी नशाबाजार आणि तरुणाईच्या वाढत्या व्यसनाधीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या अवैध व्यवसायामध्ये कोणाचे ‘संरक्षण’ आहे? पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन झोपले होते का? अशा परखड प्रश्नांनी बैठकीत तणाव निर्माण झाला.
यावर उत्तर देताना पालकमंत्री पाटील म्हणाले, "सांगलीला नशेच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढण्याचा निर्धार केला आहे. यासाठी कठोर कारवाई केली जाईल."
नशाबाजार संपवण्यासाठी तीन टप्प्यांची योजना!
पालकमंत्र्यांनी सांगितले की, नशामुक्त सांगलीसाठी तीन स्तरांवर काम केले जाणार आहे:
1. पोलिस यंत्रणेला अधिक बळकट करणे: अमली पदार्थ विरोधी मोहिमेसाठी पोलिस दलाला आवश्यक सुविधा पुरवणे.
2. गुप्त माहिती देणाऱ्यांसाठी बक्षीस योजना: माहिती देणाऱ्यांना आर्थिक बक्षीस दिले जाणार.
3. समाजाच्या सहभागातून प्रबोधन: स्वयंसेवी संस्था (NGOs) आणि स्थानिक नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय भाग घ्यावा.
नशाबाजाराविरोधात 'ऑपरेशन' सुरू होणार!
पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की, "फक्त वरवरची मलमपट्टी करून चालणार नाही, तर अमली पदार्थांच्या मुळावरच घाव घालण्याची गरज आहे." पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये ज्या कठोर कारवाया झाल्या, तशाच सांगलीतही होणार आहेत.
शाळांच्या बाहेरच्या पानपट्ट्यांपासून ते मोठ्या रॅकेट्सपर्यंत सर्वांवर कारवाई होईल. याशिवाय, विटा येथे अमली पदार्थ विरोधी कारवाई करणाऱ्या पोलिस विभागाला विशेष बक्षीस देण्यात आले.
तळ ठोकलेल्या पोलिसांची बदली अनिवार्य!
बैठकीत काही पोलिस अधिकारी अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने, त्यांच्या बदल्या कराव्यात, अशी मागणी आमदारांनी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बदली प्रक्रिया सुरू होईल, असे स्पष्ट केले.
"राजकीय हस्तक्षेप नसेल, कोणालाही सोडणार नाही!"
पालकमंत्री पाटील यांनी ठाम भूमिका घेतली की, "गुन्हेगारांना सोडवण्यासाठी राजकीय दबाव येणार नाही. कोणालाही गय केली जाणार नाही."
‘टास्क फोर्स’मध्ये हे सदस्य असणार:
1. पालकमंत्री चंद्रकांत पाटील
2. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
म
3. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे
4. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे
5. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त राहुल करंडे
नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा!
सांगली जिल्ह्याला नशामुक्त करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. "लोकसहभागाशिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने यामध्ये हातभार लावावा," असे आवाहन त्यांनी केले.