| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. ४ फेब्रुवारी २०२५
डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील तुकाराम शिंदे हे वीस वर्षांपूर्वी मानसिक आजारामुळे बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी त्यांचा अनेक वर्षे शोध घेतला, मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर सर्वांनी त्यांचा पुनर्भेटीचा आशा सोडून दिली. मात्र, तब्बल दोन दशकांनंतर श्रद्धा रिहबिलिटेशन फाउंडेशनच्या सहकार्याने त्यांचा शोध लागला आणि त्यांना थेट डोंगरसोनीत कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
नेपाळमध्ये सापडलेले शिंदे अखेर घरी परतले
तुकाराम शिंदे यांचा गावात सलून व्यवसाय होता. त्यांना पत्नी आणि एक मुलगा आहे. वीस वर्षांपूर्वी मानसिक आजाराने ते घर सोडून गेले. पोलिस आणि कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते कुठेच सापडले नाहीत. यामुळे त्यांच्या कुटुंबाने त्यांचं पुनर्भेटीचं स्वप्न मावळल्यासारखं झालं होतं.
श्रद्धा रिहबिलिटेशन फाउंडेशन ही संस्था मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या बेघर व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी काम करते. काही दिवसांपूर्वी संस्थेचे पदाधिकारी नेपाळ दौऱ्यावर होते. तेव्हा, तेथील एका सामाजिक संस्थेत त्यांना मराठी भाषिक असणारे तुकाराम शिंदे आढळून आले. तपासाअंती ते डोंगरसोनी गावचे असल्याचे स्पष्ट झाले.
कुटुंबियांना सुखद धक्का
संस्थेचे पदाधिकारी अजय रणमुरे आणि मनीषा भराडिया यांनी तुकाराम शिंदेंना घेऊन मुंबईमार्गे थेट त्यांच्या मूळ गावी आणले. सोमवारी कुटुंबीयांसोबत झालेल्या या पुनर्भेटीचा क्षण अत्यंत भावनिक ठरला. शिंदे यांच्या पत्नी आणि मुलाने त्यांना पाहताच अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
यावेळी माजी उपसरपंच किशोर कोडग, माजी पंचायत समिती सदस्य दिनकर झांबरे, रघुनाथ झांबरे, सर्जेराव झांबरे आणि इतर गावकरी उपस्थित होते. श्रद्धा रिहबिलिटेशन फाउंडेशनच्या या माणुसकीच्या कार्यामुळे बेपत्ता झालेल्या व्यक्तीला आपल्या घराचा उंबरठा पुन्हा गाठता आला.