| सांगली समाचार वृत्त |
विटा - दि. ४ फेब्रुवारी २०२५
विट्याजवळील कार्वे (ता. खानापूर) येथील बंद कारखान्यात एमडी ड्रग्ज निर्मितीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मोठा खुलासा केला असून, या प्रकरणाला थेट मुंबई कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली असून, या टोळीचे जाळे मुंबई, दिल्ली आणि गुजरातपर्यंत विस्तारले असल्याचे समोर आले आहे.
कारवाईतील प्रमुख आरोपी आणि त्यांची भूमिका
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या तपासात जितेंद्र शरद परमार (वय ४१, रा. अलिबाग, सध्या माहिम, मुंबई), अब्दुलरज्जाक अब्दुलकादर शेख (वय ५३, रा. पवई, मुंबई) आणि सरदार उत्तम पाटील (वय ३४, रा. वाळवा, सांगली) यांना अटक करण्यात आली. याआधीच रहुदिप बोरिचा (रा. सुरत), सुलेमान शेख (रा. बांद्रा, मुंबई) आणि बलराज अमर कातारी (वय २४, रा. विटा) यांना २७ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती.
गुन्ह्याचा उलगडा कसा झाला ?
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेल्या आदेशानुसार, विटाजवळील कार्वे औद्योगिक वसाहतीत बंद कारखान्यात एमडी ड्रग्ज तयार केल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत १४ किलो ५०० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले, ज्याची बाजारातील किंमत अंदाजे २९ कोटी रुपये आहे.
तपासादरम्यान अटक आरोपींची कसून चौकशी करण्यात आली असता, जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख आणि सरदार पाटील यांची नावे समोर आली. या तिघांना फलटण येथून अटक करण्यात आली. चौकशीत उघडकीस आले की, हे सर्वजण याआधीही ड्रग्ज प्रकरणात अटकेत होते आणि ऑर्थर रोड कारागृहात त्यांची ओळख झाली होती.
ड्रग्ज कारखान्याची तयारी कशी झाली ?
जामिनावर सुटल्यानंतर या सहाजणांनी पुन्हा एकत्र येऊन एमडी ड्रग्ज तयार करण्याचा कट रचला. रहुदिप बोरिचाने दिल्लीहून मशिनरी मागवली, तर सुलेमान शेखने आर्थिक मदत केली. बलराज कातारीने कारखान्याची तयारी करण्यास मदत केली.
जितेंद्र परमार याने कारखाना उभारणीसाठी आर्थिक गुंतवणूक केली, तर सरदार पाटील हा रसायनशास्त्रात पारंगत असल्याने त्याने उत्पादन प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले. बलराज कातारी हा अब्दुलरज्जाक शेखसह पुणे आणि मुंबईत ड्रग्जचा पुरवठा करीत होता.
यापूर्वीही मुंबईत मोठा ड्रग्ज गुन्हा
टोळीतील सुलेमान शेख, जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख आणि सरदार पाटील हे २०१९ मध्ये मुंबईतील काळा चौकी पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या एका मोठ्या ड्रग्ज प्रकरणात अटक झाले होते. त्यावेळी २०० किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. पाच वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर हे आरोपी बाहेर आले आणि पुन्हा ड्रग्ज उत्पादन सुरू करण्याचा कट त्यांनी आखला.
पुढील तपास सुरु
या प्रकरणातील आर्थिक गुंतवणूकदार आणि ड्रग्जचा कच्चा माल पुरवठादार कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची वेगवेगळी पथके मुंबई, दिल्ली आणि गुजरातमध्ये तपास करत आहेत. पोलिस पुढील कारवाईत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
बातमी स्रोत - दै. लोकमत