yuva MAharashtra दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, गुन्हे अन्वेषणची धडाकेबाज कारवाई !

दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, गुन्हे अन्वेषणची धडाकेबाज कारवाई !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ फेब्रुवारी २०२५

सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हे डिटेक्शनचा धडाकाच लावला आहे. विभागाच्या पथकाने दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून त्यांच्याकडून ३ लाख ४० हजार रुपयांच्या चार चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. जावेद मिरासो मुजावर (वय ३५, रा. हनुमान मंदिरानजीक, बुर्ली, ता. पलूस) आणि उमेश रामचंद्र जाधव (वय ४९, रा. आंधळी रस्ता, पलूस) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

घटनेची माहिती अशी, वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषणने विशेष पथक स्थापन केले आहे. पथकास, मिरज येथील पंचशीलनगर चौकात विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरुन दोघेजण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला असता तेथे दोघे एका दुचाकीसह थांबलेले आढळले. त्यांना पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी ताब्यात घेतले. दुचाकीबाबत चौकशी केली असता दोघांनी, काही दिवसांपूर्वी सदर दुचाकी मिरज येथील गुरुवार पेठेतून चोरली असून त्याची विक्री करण्यासाठी घटनास्थळी आल्याचे चोरट्यांनी सांगितले.


पोलीस चौकशीत दोघा संशयितांनी सात ते आठ महिन्यांपासून काही दुचाकी चोरल्याची माहिती दिली. चोरीच्या दुचाकी मिरज येथील कृषी बाजार समिती येथील सिटी सर्व्हे कार्यालयाच्या मोकळ्या जागेत ठेवल्या असल्याची कबुली दिली. पोलिसांनी बाजार समिती परिसरात जावून पाहणी केली असता तेथे ६ चोरीच्या दुचाकी लावलेल्या आढळल्या. सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दोघा चोरट्यांवर मिरज शहर, विटा, शिराळा, कराड, कराड ग्रामीण, शिरोळ पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यातील संशयित जावेद मुजावर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पलूस पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे नोंद आहेत. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरिक्षक सिकंदर वर्धन, पोलीस कर्मचारी संजय पाटील, अतुल माने, अमोल लोहार आदींसह पथकाने केली.