yuva MAharashtra पालक सचिव विनिता वेद सिंगल यांनी १०० दिवस कृती आराखड्यांतर्गत घेतला प्रमुख विभागांच्या कामांचा आढावा !

पालक सचिव विनिता वेद सिंगल यांनी १०० दिवस कृती आराखड्यांतर्गत घेतला प्रमुख विभागांच्या कामांचा आढावा !

फोटो सौजन्य  - दै. ललकार   

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ फेब्रुवारी २०२५

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांचे जीवन अधिक सुकर करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने कार्य करावे, असे निर्देश जिल्ह्याच्या पालक सचिव तथा पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. १०० दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने घेतलेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपवनसंरक्षक नीता कट्टे आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सेवा ऑनलाईन करण्यावर भर

पालक सचिवांनी नागरिकांसाठी प्रशासनाच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याच्या गरजेवर भर दिला. तसेच, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे, असे त्यांनी सांगितले. विशेषत: दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र वैद्यकीय पथक स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.


पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी पर्यावरणपूरक उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करावे, हरित कार्यालय संकल्पना राबवावी, तसेच स्थानिक स्तरावर शाश्वत विकासासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. 'माझी वसुंधरा' अभियान प्रभावीपणे राबवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

महिला आणि विद्यार्थी सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना

शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी, विशेषत: मुली आणि युवतींच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक वाहतुकीच्या स्थानांवर आणि शाळा सुटण्याच्या वेळेत पोलिसांनी अधिक दक्ष राहावे, अशी सूचना त्यांनी दिली.

डिजिटल प्रशासन व भू-संपत्ती व्यवस्थापन

सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा नोंदी ई-सेवा पुस्तकाच्या स्वरूपात ठेवण्याची सूचना त्यांनी केली. तसेच, सरकारी मालमत्तांचे जिओ-टॅगिंग करून त्या नोंदी डिजिटल स्वरूपात अद्ययावत ठेवाव्यात, असे त्यांनी सांगितले. पाणंद रस्त्यांचे जुने नकाशे तपासून, नव्या पाणंद रस्त्यांचे ड्रोन मॅपिंग करण्याचा विचार करावा, असेही त्यांनी सुचवले.

विभागीय कामांचा आढावा

बैठकीत विविध विभागांनी आपल्या प्रगतीचा आढावा सादर केला. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी महसूल विभागाच्या 'सात कलमी कार्यक्रम' आणि 'दशसूत्री कार्यक्रम' यांची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शिक्षण, पाणीपुरवठा आणि 'माझी वसुंधरा' अभियानातील यशावर सविस्तर माहिती दिली. मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या उपक्रमांचा आढावा मांडला, तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सुरक्षा विषयक उपाययोजनांची माहिती दिली.

या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपक्रम आणि योजनांवर चर्चा झाली. तसेच, नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि पारदर्शक प्रशासन प्रदान करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.