yuva MAharashtra डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावे डिजिटल लोकविद्यापीठ व आंतरधर्मीय वधू-वर मंडळ सुरू होणार !

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावे डिजिटल लोकविद्यापीठ व आंतरधर्मीय वधू-वर मंडळ सुरू होणार !


| सांगली समाचार वृत्त |
रत्नागिरी - दि. ४ फेब्रुवारी २०२५

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मरणार्थ डिजिटल लोकविद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी येथे झालेल्या समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह प्रोत्साहन देण्यासाठी विशेष वधू-वर सूचक मंडळ सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

विज्ञाननिष्ठ विचारांचा प्रसार

राज्यातील १७ जिल्ह्यांमधून १२५ कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचारासाठी 'डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ' सुरू करून विविध ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महत्त्वाचे निर्णय आणि पुढील उपक्रम

या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये –
✅ जादूटोणाविरोधी कायदा राष्ट्रीय स्तरावर लागू करण्यासाठी प्रयत्न
✅ सुशिक्षितांमधील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विशेष अभियान
✅ आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन आणि वधू-वरांची माहिती संकलन
✅ सत्यशोधकी विवाह इच्छुकांसाठी राज्यस्तरीय मंडळ स्थापन
✅ समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धांविरोधात सक्रिय भूमिका
✅ मोबाईलच्या व्यसनाविरोधात विशेष जनजागृती मोहीम
✅ विवेकी जोडीदार निवड व मानसिक आरोग्यासाठी कार्यकर्त्यांचे संघटन


महिला परिषद आणि संघटना बांधणी अभिया

येत्या मार्च महिन्यात नागपूर येथे 'अंधश्रद्धा निर्मूलन महिला परिषद' आयोजित केली जाणार आहे. तसेच, फेब्रुवारी ते मेदरम्यान राज्यभरात 'संघटना बांधणी अभियान' राबवले जाईल. या अंतर्गत, अंनिसच्या प्रमुख सदस्यांकडून महाराष्ट्रातील विविध शाखांना भेटी देऊन संघटनेचे कार्य अधिक बळकट करण्यात येणार आहे.

बैठकीला उपस्थित मान्यवर

या बैठकीस अभिजित हेगशेट्ये, नित्यानंद भुते, मिलिंद देशमुख, रामभाऊ डोंगरे, मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात, हमीद दाभोलकर, सम्राट हटकर, नंदिनी जाधव, राजीव देशपांडे, अनिल चव्हाण, अण्णा कडलास्कर, दीपक गिरमे, गणेश चिंचोले आदी मान्यवर उपस्थित होते.