| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ फेब्रुवारी २०२५
सांगलीतील कृष्णा नदी सात-आठ दिवसांपासून दुर्गंधीयुक्त झाली असून, या दुर्गंधीमुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आयर्विन पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही नाक मुठीत धरावे लागत आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळेस ही दुर्गंधी अधिक तीव्र जाणवते.
प्रदूषणाचा वाढता धोका
सांगली बंधाऱ्यामुळे कृष्णा नदीचे पाणी प्रवाही न राहता एका ठिकाणी थांबले आहे. यामुळे त्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. त्यातच शहरातील शेरीनाल्यांचे सांडपाणी वर्षानुवर्षे नदीत मिसळत असल्याने प्रदूषणाचा स्तर अधिकच वाढला आहे. मात्र, संबंधित प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
शेरीनाला योजना अपयशी?
शेरीनाल्याचे पाणी नदीत मिसळू नये म्हणून महापालिकेने जुनी शेरीनाला योजना आणि धुळगाव योजना कार्यान्वित केली आहे. यासाठी 300 अश्वशक्तीचे चार विद्युत उपसापंप वापरण्यात येतात. मात्र, सकाळी 8 ते 12 या वेळेत सांडपाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे पंप पूर्ण क्षमतेने चालू असूनही काही प्रमाणात सांडपाणी नदीत जातच राहते.
महापालिकेने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी 93.35 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला असून, तो चार-पाच महिन्यांपासून मंत्रालयात प्रलंबित आहे. शासनाची मंजुरी कधी मिळेल आणि प्रत्यक्ष काम कधी सुरू होईल, याबाबत नागरिकांमध्ये मोठी अनिश्चितता आहे.
सांगलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न तरी सोडवणार का?
गेल्या 35-40 वर्षांपासून सांगलीकरांना शेरीनाल्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अनेक लोकप्रतिनिधी बदलले, पण शेरीनाल्यापासून मुक्तता मिळालेली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. "सांगलीचे पाणी पचवू शकला, तो जगातील कुठल्याही ठिकाणचे पाणी पचवू शकतो," असे उपरोधिक वक्तव्य आता प्रचलित झाले आहे. कृष्णा नदीचे गटारगंगेत रूपांतर होऊन आता दुर्गंधी पसरली असूनही प्रशासन शांत आहे.
सांगलीकरांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहून प्रशासनावर दबाव टाकण्याची गरज आहे, अन्यथा येणाऱ्या काळात आरोग्यविषयक गंभीर परिणाम भोगावे लागतील.
बातमी संदर्भ - दै. पुढारी