| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ फेब्रुवारी २०२५
अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा... पैकी वस्त्र ही गरज भागवण्यासाठी अनेक माध्यमे काम करीत असतात. यातील एक माध्यम म्हणजे 'टेलर'... पूर्वीच्या शब्दात सांगायचे झाले तर 'शिंपी'... या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मोठी परंपरा आहे... अशाच परंपरेतील एक मोठे नाव म्हणजे श्री. रामचंद्र दत्तात्रय रानभरे...
संकटाच्या वणव्यात, त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय तारलाच, पण त्याचवेळी अनेकांच्या हाताला काम देऊन, अनेक कुटुंबांना हातभार लावण्याचे काम श्री. रानभरे यांनी केले आहे. १९४० साली त्यांचे वडील श्री. दत्तात्रय रानभरे यांनी मिरजेत छोटेखानी टेलरिंग चा व्यवसाय सुरू केला. त्याकाळीही संकटे कमी नव्हती. पण श्री. दत्तात्रय रानभरे यांनी त्यावर मात करीत, एकाची चार शिलाई मशीन केली... स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी आपल्या व्यवसायाला नवभारत हे नाव दिले. स्वतःबरोबरच इतरांनाही शिलाई व्यवसायाच्या माध्यमातून उभारी दिली...
त्यांचा हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून, व्यवसायातील नीतिमत्ता हीच त श्री. रामचंद्र रानभरे यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली. आज नवभारत टेलर्स आणि श्री. रामचंद्र रानभरे हे नाव टेलरिंग व्यवसायात आदराने घेतले जाते. एकीकडे रेडीमेड आणि ऑनलाईन व्यवसायाने टेलरिंग व्यवसायावर संकटांचे सावट असताना, श्री. रामचंद्र रानभरे यांचे चाहते व नवभारत टेलर्सचे ग्राहक केवळ मिरज शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आहेत.
या साऱ्या कष्टाची आणि यशोगाथेची दखल, तासगाव येथील प्रतिष्ठा फाउंडेशनचे संस्थापक श्री तानाजीराजे जाधव यांनी घेऊन, श्री रामचंद्र दत्तात्रय रानभरे यांना शिवाजी विद्यापीठासह पाच विद्यापीठांचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे या शिक्षण क्षेत्रातील महनीय व्यक्तीच्या हस्ते, मानाचा प्रतिष्ठा राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार बहाल केला. रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी तासगाव येथील समृद्धी मल्टीपर्पज हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
श्री. रामचंद्र दत्तात्रय रानभरे यांना प्रतिष्ठा राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार मिळाल्याने टेलरिंग व्यवसायासह सर्वच क्षेत्रातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.