| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ फेब्रुवारी २०२५
मुंबई उच्च न्यायालयाने मशिदींवरील भोंग्यांबाबत दिलेल्या निकालाची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भोंगे हटवण्याची मागणी केली. त्यांनी वृद्ध, आजारी व्यक्ती, तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण करणारे आणि संभाव्य दंगल काळात गैरवापर होऊ शकणारे भोंगे त्वरित उतरवण्याचा आग्रह धरला.
न्यायालयाचा आदेश लागू करा – हिंदू एकता आंदोलनाचा आग्रह
यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, यापूर्वीही न्यायालयाने मशिदींवरील भोंग्यांबाबत निर्णय दिले होते, परंतु तत्कालीन सरकारने मुस्लिम मतांचे राजकारण करत आदेशाची अंमलबजावणी केली नाही. मात्र, सध्या राज्यात हिंदुत्ववादी सरकार असल्याने 31 मेपर्यंत गडकोट आणि किल्ल्यांवरील इस्लामिक अतिक्रमण हटवण्याचा निर्णय जसा घेतला गेला, तसाच निर्णय मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठीही घ्यावा आणि संपूर्ण महाराष्ट्र भोंगेमुक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली.
सांगलीत मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण – हिंदू एकता आंदोलनाचा आरोप
शहरातील अनेक भागांत अवघ्या 100-200 मीटर अंतरावर अनेक मशिदी असल्याने प्रचंड ध्वनी प्रदूषण होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शिवाय, अनेक भोंगे अनधिकृत असल्याचा दावा करत, प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांनी केली.
तक्रार नोंदवा – हिंदू एकता आंदोलनाचे आवाहन
आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले. तसेच, तक्रारीसाठी आवश्यक छापील अर्ज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने उपलब्ध करून दिले जातील, असेही जाहीर करण्यात आले.
या आंदोलनात दत्तात्रय भोकरे, विष्णू पाटील, परशुराम चोरगे, सोमनाथ गोटखिंडे, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, प्रदीप निकम, नारायण हांडे, अविनाश मोहिते, मनोज साळुंखे, अरुण वाघमोडे, विनायक एडके, यश पाटील, राम काळे, सुजित राजोबा, प्रथमेश चौगुले, संभाजी पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.