| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २ फेब्रुवारी २०२५
मिरज, जी वैद्यकीय सेवेसाठी प्रसिद्ध आहे, तेथे सुमारे दीडशे वर्षांची वैद्यकीय परंपरा आहे. १८९४ मध्ये अमेरिकन मिशनरी डॉ. विल्यम वॉन्लेस यांनी आधुनिक वैद्यकीय उपचारांसाठी येथे वॉन्लेस (मिशन) रुग्णालयाची स्थापना केली होती. गेल्या १३० वर्षांपासून हजारो रुग्णांना मदत करणारे हे रुग्णालय आर्थिक अडचणींमुळे मागील तीन वर्षांपासून बंद होते.
हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि रुग्णसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नेते विनोद निकाळजे यांच्या नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट संस्थेकडे वॉन्लेस रुग्णालयाचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत करार करण्यात येणार असून, त्यामुळे रुग्णालय पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता आहे.
खासगी संस्थेचा पुढाकार
विजेची व पाण्याची थकबाकी असल्याने रुग्णालयाची सेवा बंद पडली होती. मात्र, विनोद निकाळजे यांच्या संस्थेने पुढाकार घेत हा प्रकल्प हाती घेण्याची तयारी दर्शवली आहे. यासंबंधीच्या बैठकीत हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर चर्चा करण्यात आली आहे.
रुग्णालय कर्मचाऱ्यांना दिलासा
वॉन्लेस रुग्णालय नवीन व्यवस्थापनाखाली सुरू होत असल्याने तेथील ४०० कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांच्या थकीत वेतनाच्या सुमारे २५ कोटी रुपयांची रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. दोन आठवड्यांत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रुग्णालयाच्या नव्या प्रवासाला प्रारंभ होईल, अशी माहिती रिपाइं'चे नानासाहेब वाघमारे यांनी दिली.
ही घडामोड मिरजेतील वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्त्वाची असून, नव्याने सुरू होणाऱ्या वॉन्लेस हॉस्पिटलमुळे रुग्णांना पुन्हा उत्तम सेवा मिळण्याची अपेक्षा आहे.
मूळ बातमीतील स्रोत - दै. लोकमत