| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. २ फेब्रुवारी २०२५
मिरज तालुक्यातील आरग येथील मालती नेमिनाथ चौगुले कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय हा यशवंत शिक्षण संस्थेनं आरग, बेडग, लक्ष्मीवाडी व शिंदेवाडीसाठी बहाल केलेला नोबेल पुरस्कार आहे. या शाळेच्या १०वी व १२वी च्या उज्ज्वल निकालाची परंपरा, विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी राबवण्यात येणारे शालेय व सहशालेय उपक्रम, क्रिडा प्रोत्साहन आणि चांगले संस्कार पहाता इथे बहुजनांच्या लेकरांना सामर्थ्य दिले जाते. असे उद्गार प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी काढले.
यशवंत शिक्षण संस्थेच्या मालती नेमिनाथ चौगुले कन्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार व दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा समितीचे अध्यक्ष अशोक वडगावे होते. यावेळी प्रा. बिरनाळे पुढे म्हणाले, ' बाहेर काम करुन शिकणारी मुले या शाळेत आहेत. शेतमजूरी व वहान चालक म्हणून काम करत शिकणाऱ्या मुलांना शिकवून कर्मवीर भाऊराव पाटील व ज्योतिबा व सावित्रीमाई फुले यांचा वारसा शाळेत जपला जातो. स्व. शरद पाटील सरनी या भागातील हजारो मुलांना घडवले आहे. संस्थेचे विद्यमान चेअरमन राजगोंडा काका संस्थेच्या विकासासाठी मोठी मेहनत करत आहेत. मुख्याध्यापिका रजनी कुंभार आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. या शाळेच्या मुला-मुलींनी कल्पना चावला, युसूफजाई मलाला यांची जिद्द लक्षात घेऊन कितीही अडचणी आल्या तरी भरपूर शिक्षण घेऊन संस्था, शाळा, आई-वडील आणि शिक्षकांचे नाव रोषण करावे.
दहावीच्या. विद्यार्थ्यांनी याच शाळेत ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन उत्तम करीअर करावे.चांगल्या शाळेत पाल्यांना घातल्याबद्दल पालकांचे अभिनंदन. पारितोषिक प्राप्त सर्वांचे अभिनंदन.देणगीदारांचे अभिनंदन. गरिबांना शिक्षण देणारी यशवंत शिक्षण संस्था, शाळेचे काम उत्कृष्टपणे करत असलेली स्कूल कमिटी, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन.
प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी अनेक यशस्वी व्यक्तींची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना सव्वा तास जागेवर खिळवून ठेवले होते.
अध्यक्षीय भाषणात अशोक वडगावे यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थींनींचे अभिनंदन करुन ज्यांची पारितोषिके थोडक्यात हुकली त्यांनी पुन्हा जोमाने काम करत यश खेचून आणावे. खूप शिकून यशवंत व्हावे. असे उद्गार काढले.
मुख्याध्यापिका रजनी कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविकात शाळेतील मूल्यवर्धन, यशवंत एज्युकेअर, विविध स्पर्धांचे आयोजन, गुणवत्ता विकास यांची माहिती दिली. कोळी सर यांनी माध्यमिक तर तोडकर मॅडम यांनी उच्च माध्यमिक गुणवंत विद्यार्थी आणि स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थींनीच्या यादीचे वाचन केले. प्रा. एन.डी.बिरनाळे, अशोक वडगावे, बी. आर. पाटील,देवेंद्र चिवटे, रजनी कुंभार, विभा शहा, स्कूल कमिटी सदस्य, सकाळचे पत्रकार निरंजन सुतार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते पाचवी, आठवी, नववी दहावी व बारावीच्या बौध्दिक व क्रिडा स्पर्धेत चमकलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरण करण्यात आली..दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे प्रा. एन.डी.बिरनाळे यांच्या हस्ते शाळेस भेटवस्तू दिल्या.
यावेळी चंद्रकांत माळी, चेतन पाटील, संभाजी पाटील, राजेंद्र पवार, कवठेकर, निवृत्त शिक्षक सुतार, पालक व विद्यार्थी व विद्यार्थींनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.