| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ फेब्रुवारी २०२५
सांगली: एसटी महामंडळातून निवृत्त होणारे कर्मचारी, चालक, वाहक आणि अधिकारी यांचा सेवानिवृत्ती समारंभ पूर्वी ज्या ठिकाणी कर्मचारी कार्यरत होते त्या डेपोमध्येच साजरा केला जात असे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून एसटी महामंडळाने एक नवीन परिपत्रक जारी करून निवृत्त कर्मचाऱ्यांचा समारंभ विभागीय कार्यालयात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
आगारातच समारंभ साजरा करा, अन्यथा आंदोलन:
यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना मा. आ. नितिन शिंदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, "कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी आयुष्यभर सेवा दिली, जिथे त्यांचे संबंध तयार झाले, त्या सोबत्यांसोबतच त्यांच्या डेपोमध्ये सेवानिवृत्ती समारंभ साजरा होणे आवश्यक आहे. ही प्रत्येक कर्मचाऱ्याची अपेक्षा असते." ते सांगली आगारातील ज्येष्ठ चालक संजय पाटील (बापू) यांच्या सेवानिवृत्ती समारंभात बोलत होते.
एसटी कष्टकरी जनसंघाचा सत्कार:
संजय पाटील यांच्या सेवानिवृत्ती समारंभात एसटी कष्टकरी जनसंघच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी महेश शेळके, रमेश ढमाळ, सुरेश माने, सतिश गायकवाड, पिंताबर मंडले, स्वप्निल पाटील, शामराव पाटील, अशोक काळकुटे, शांतिनाथ पाटील, तसेच महिला पदाधिकारी सौ. मिनाताई जाधव, सौ. मनिषा दबडे, सौ. अश्विनी भोसले, सौ. जयश्री घोडके, सौ. सुषमा धनगेकर, सौ. भारती खोत यांच्या उपस्थितीमध्ये समारंभ संपन्न झाला.
आगारप्रमुख आणि अधिकारी उपस्थित:
यावेळी सांगली आगारप्रमुख महेश पाटील, वाहतूक निरिक्षक श्रीकांत दळवी व अनेक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.