yuva MAharashtra विटा एमडी ड्रग्ज प्रकरण: सरकारी यंत्रणांवर संशयाचे मळभ, परवानगीविना कारखाना कसा सुरू झाला ?

विटा एमडी ड्रग्ज प्रकरण: सरकारी यंत्रणांवर संशयाचे मळभ, परवानगीविना कारखाना कसा सुरू झाला ?

फोटो सौजन्य  - Chat GPT 

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ फेब्रुवारी २०२५

सांगली जिल्ह्यातील कार्वे औद्योगिक वसाहतीत चालवण्यात येत असलेल्या एमडी ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश झाल्याने सरकारी यंत्रणांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. केवळ चार-पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी परफ्युम आणि केमिकल उद्योगाच्या नावाखाली अमली पदार्थांचे उत्पादन सुरू होते. मात्र, पोलिस, अन्न व औषध प्रशासन तसेच औद्योगिक विकास महामंडळाला याचा थांगपत्ता लागला नाही, हे धक्कादायक आहे.

गुजरातचा मास्टरमाईंड आणि विटा कनेक्शन

या कारखान्यात मेफॅड्रॉन (एमडी) ड्रग्जचे उत्पादन सुरू असल्याचे सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री उघडकीस आणले. या छाप्यात ३० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा कारखाना सुरू करण्यामागे गुजरातचा मास्टरमाईंड राहुदीप बोरीचा असल्याचे समोर आले आहे. बोरीचा याने सात वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर पुन्हा विटा येथे येऊन एमडी ड्रग्ज उत्पादन सुरू करण्याचे धाडस केले.

कसे उघडले ड्रग्जचे अड्डे ?

पोलिसांनी केलेल्या कारवाईत राहुदीप बोरीचा, मुंबईचा सुलेमान जोहर शेख आणि विट्यातील बलराज कोतारी या तिघांना अटक करण्यात आली. हे तिघेही सराईत गुन्हेगार असून, बोरीचा याने विट्यातील कोतारीच्या मदतीने कार्वे एमआयडीसीतील एक बंद असलेले शेड शोधून काढले. मालकाशी संपर्क साधून परफ्युम आणि केमिकल उद्योग सुरू करण्याच्या नावाखाली शेड भाड्याने घेण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात त्याठिकाणी एमडी ड्रग्जचे उत्पादन सुरू करण्यात आले.

प्रशासन अनभिज्ञ कसे राहिले ?

या प्रकरणात सर्वाधिक धक्का देणारी बाब म्हणजे दीड ते दोन महिने हा बेकायदेशीर उद्योग सुरू असूनही स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना याची कल्पनाही नव्हती. कारखाना एमआयडीसी क्षेत्रात असूनही त्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती.

एमआयडीसी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण:

माउली इंडस्ट्रीजला हा प्लॉट २०२० साली हस्तांतरित झाला होता. येथे तार आणि खिळे उत्पादनाचा परवाना घेतला होता, मात्र प्रत्यक्षात उद्योग सुरू करण्यात आलेला नव्हता. दीड वर्षांपूर्वी यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर कोणत्या उद्योगाची सुरुवात झाली, याची तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे एमडी ड्रग्ज उत्पादनाबाबत एमआयडीसीला कोणतीही माहिती नव्हती.

मूळ बातमीतील स्रोत - दै. लोकमत