| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ फेब्रुवारी २०२५
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळांवरील स्पीकर हटवण्याच्या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाने निदर्शने आयोजित केली आहेत. सोमवार, ३ फेब्रुवारी २०२५, रोजी सांगली, मिरज, कोल्हापूर, कराड, धुळे आणि इतर ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११:०० वाजता हे निदर्शने होणार असल्थाची माहिती हिंदू एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण यांनी एका प्रसिद्ध पत्रकारद्वारे दिली आहे.
ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न
शहरातील विविध भागांमध्ये अनेक धार्मिक स्थळांवर स्पीकरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे वृद्ध, लहान मुले, विद्यार्थी तसेच रुग्णालयातील रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागतो. दिवसातून पाच वेळा होणाऱ्या या आवाजामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. तसेच, अनेक ठिकाणी परवाना न घेता स्पीकर वापरण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.
न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आवश्यक
यापूर्वीही ध्वनी प्रदूषणविरोधी आंदोलन झाले होते, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. सध्या राज्यात नवीन सरकार स्थापन झाले असून, उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांवरील अनधिकृत स्पीकर हटवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाने केली आहे.
आमदारांनी पुढाकार घ्यावा
महायुतीच्या आमदारांनी आपल्या मतदारसंघातील जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनाचे नेतृत्व व आयोजक
ही निदर्शने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होतील. तसेच, सांगली शहर अध्यक्ष संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णू पाटील, तसेच प्रकाश चव्हाण, दत्तात्रय भोकरे, मनोज साळुंखे, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, अरुण वाघमोडे, रवि वादवने, प्रदीप निकम, श्रीधर मिस्त्री, अविनाश मोहिते, महेश सायमोते, भूषण गुरव, प्रकाश निकम, नारायण हांडे, संभाजी पाटील, विनायक काळेल, ओंकार शिंदे आदी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.