yuva MAharashtra मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया!


फोटो सौजन्य - gettyimage

| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १ फेब्रुवारी २०२५

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये करप्रणालीत मोठे बदल करत नोकरदार वर्गाला मोठा दिलासा देण्यात आला आहे. वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही, तसेच स्टार्टअपसाठी क्रेडिट लिमिट 10 कोटींवरून 20 कोटी करण्यात आली आहे. शेती क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धन धन्य कृषी योजना’ जाहीर करण्यात आली असून, त्याचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा थेट सात लाखांवरून 12 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे नोकरदार, मध्यमवर्गीय आणि नवतरुणांना मोठा फायदा होईल. यामुळे त्यांच्या हातात अधिक पैसा राहील, जो देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक ठरेल. MSME क्षेत्राला याचा मोठा लाभ होईल आणि रोजगाराच्या संधी वाढतील.

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे निर्णय

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पातील इतर महत्त्वाच्या निर्णयांवरही प्रकाश टाकला. शेतकऱ्यांसाठी 100 जिल्ह्यांमध्ये विशेष कृषी विकास योजना राबवली जाणार असून, तेलबिया पिकांच्या शंभर टक्के खरेदीसाठी हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्य मिळेल. मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांसाठीही क्रेडिट लिमिट 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



महाराष्ट्र – स्टार्टअप हब

फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वाढत्या स्टार्टअप संस्कृतीबाबतही भाष्य केले. महाराष्ट्र आता देशातील स्टार्टअप केंद्र म्हणून उदयास येत आहे. नव्या धोरणांमुळे स्टार्टअप्सला अधिक वित्तीय पाठबळ मिळणार आहे, जे तरुण उद्योजकांसाठी संधीचे दार उघडेल. याशिवाय, पायाभूत सुविधांसाठी नवीन PPP प्रकल्पांची घोषणा करण्यात आली असून, त्यात खाजगी गुंतवणुकीला चालना दिली जाणार आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीला गती मिळेल.

देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी टर्निंग पॉईंट

मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प भारताच्या आर्थिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे नमूद केले. मध्यमवर्गीय, शेतकरी, स्टार्टअप्स आणि व्यवसायिकांसाठी केलेले निर्णय अर्थव्यवस्थेला नवी दिशा देतील आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती देतील, असेही ते म्हणाले.