| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ फेब्रुवारी २०२५
सातबारा उतारा हा शेतजमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. जमीन खरेदी-विक्री, कर्ज व्यवहार आणि मालमत्तेशी संबंधित वाद सोडवण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तब्बल 50 वर्षांनंतर राज्याच्या महसूल विभागाने सातबारा उताऱ्यात मोठे सुधारित बदल केले आहेत. या 11 नव्या बदलांमुळे जमिनीच्या नोंदी अधिक स्पष्ट आणि अचूक होणार आहेत.
सातबारा उताऱ्यात करण्यात आलेले 11 महत्त्वाचे बदल
1️⃣ गावाचा कोड क्रमांक – सातबारा उताऱ्यात गावाच्या नावासोबत स्थानिक स्वराज्य संस्थेचा (Local Government Directory) कोड क्रमांकही दिसणार.
2️⃣ जमिनीच्या क्षेत्राची स्पष्टता – लागवडीयोग्य आणि नापीक (पोटखराब) क्षेत्र स्वतंत्र दाखवले जाणार, तसेच दोन्हींची एकूण बेरीज स्पष्टपणे नमूद केली जाणार.
3️⃣ नवी क्षेत्र मापन पद्धती – शेतीसाठी ‘हेक्टर-आर-चौरस मीटर’ तर बिनशेतीसाठी ‘आर-चौरस मीटर’ हे प्रमाणित एकक लागू करण्यात आले आहे.
4️⃣ खाते क्रमांक अधिक स्पष्ट – यापूर्वी इतर हक्कांमध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता खातेदाराच्या नावासमोर थेट नमूद केला जाणार.
5️⃣ मयत खातेदारांच्या नोंदीत बदल – मृत व्यक्ती, कर्जबोजे आणि ई-करारासंदर्भातील नोंदी आता कंसाऐवजी आडव्या रेषेत दर्शवण्यात येणार.
6️⃣ प्रलंबित फेरफारांसाठी स्वतंत्र रकाना – फेरफार प्रक्रिया अपूर्ण असलेल्या जमिनींसाठी स्वतंत्र ‘प्रलंबित फेरफार’ रकाना समाविष्ट केला आहे.
7️⃣ जुने फेरफार क्रमांक वेगळे – जुन्या फेरफार क्रमांकांसाठी स्वतंत्र रकाना तयार करण्यात आला आहे, त्यामुळे माहिती शोधणे सोपे होणार.
8️⃣ खातेदारांच्या नावांमध्ये ठळक विभागणी – दोन खातेदारांची नावे वेगळी ओळखण्यासाठी त्यांच्यामध्ये ठळक रेषा देण्यात येणार आहे.
9️⃣ गट क्रमांक आणि शेवटचा व्यवहार – गट क्रमांकासोबत शेवटच्या फेरफाराची तारीख आणि क्रमांक ‘इतर हक्क’ रकान्यात शेवटी दाखवली जाणार.
🔟 बिनशेती जमिनींसाठी नवा नियम – बिनशेती क्षेत्रासाठी ‘आर-चौरस मीटर’ हेच अधिकृत एकक राहील. जुडी व विशेष आकारणीसंबंधी रकाने हटवण्यात आले आहेत.
1️⃣1️⃣ अकृषिक जमिनींसाठी विशेष सूचना – बिनशेतीच्या सातबारा उताऱ्याच्या शेवटी स्पष्ट उल्लेख केला जाणार: "सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने गाव नमुना-12 लागू नाही."
नव्या सातबारा उताऱ्याचे नागरिकांना होणारे फायदे
▪️ सुधारित सातबारा उतारा अधिक स्पष्ट आणि माहितीपूर्ण बनणार.▪️ महसूल विभागाचे काम अधिक अचूक व गतिमान होईल.▪️ डिजिटल प्रणालीमुळे प्रक्रिया सुलभ होणार.▪️ 3 मार्च 2020 पासून सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासन आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा अधिकृत लोगो लावण्यास मान्यता देण्यात आली आहे.हे बदल सातबारा उताऱ्याला अधिक पारदर्शक आणि सोपे बनवणार आहेत. नागरिकांना आता जमिनीशी संबंधित महत्त्वाची माहिती अधिक सोप्या भाषेत आणि स्पष्ट स्वरूपात उपलब्ध होणार आहे.