| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जानेवारी २०२५
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन २६ व २७ जानेवारी २०२५ रोजी संस्कृती सांस्कृतिक हॉल गडचिरोली येथे होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस विकास सूर्यवंशी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. २७ जानेवारी सोमवार रोजी सकाळी ११ वाजता संस्कृती सभागृह अमरोली रोड गडचिरोली येथे अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. सरचिटणीस विकास सूर्यवंशी सांगली, उपाध्यक्ष रघूनाथ कांबळे कोल्हापूर, सल्लागार शिवगोंड खोत इचलकरंजी, कार्यकारणी सदस्य गोरख भिलारे पंढरपूर, सचिन चोपडे सांगली, राजेंद्र माळी सातारा, शाम थोरात बार्शी यांच्या नेतृत्वाखाली सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा व सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातून वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.
२६ व २७ जानेवारी असे दोन दिवस वृत्तपत्र विक्रेत्यांचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन लॉयड्स मेटल्स स्टील प्लांट कोनसरी कंपनीचे रेसिडेंशिअल डायरेक्टर कर्नल विक्रम मेहता यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी खनीकर्म व शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर हे आहेत. ठाण्याचे आमदार संजयजी केळकर, गडचिरोली चिमूर चे खासदार नामदेव किरसान गडचिरोलीचे आमदार मिलिंद नरोटे, अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आरमोरीचे आमदार रामदास मसराम, गडचिरोली चे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार देवराव होळी, माजी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेते आमदार कृष्णाजी गजबे, पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार सल्लागार शिवगोंड खोत, चामोर्शी बाजार समितीचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार, गडचिरोली नगराध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, गडचिरोली नगरपालिकेचे माजी सभापती विजय गोरडवार हे उपस्थित राहणार आहेत.
रविवार २६ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता राज्यभरातील सर्व वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते यांचे गडचिरोली येथे आगमन होईल. दुपारी चार वाजता महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता राज्य संघटनेच्या कार्यसमितीची बैठक होणार आहे. सहा वाजता राज्य संघटनेची सर्वसाधारण सभा होईल. रात्री आठ वाजता खुली चर्चा होणार असून त्यानंतर पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
राज्य संघटनेचे खुले अधिवेशन २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार असून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करण्याची घोषणा मागील सरकारने केली असून मंत्रिमंडळामध्ये त्याला मंजुरी मिळालेली आहे. हे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ तात्काळ कार्यान्वित करून वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय द्यावा, अशी मुख्य मागणी या अधिवेशनामध्ये असणार आहे. याशिवाय वृत्तपत्र विक्रेत्यांच्या इतर प्रश्नांसह वृत्तपत्र वितरण वृत्तपत्र व्यवसाय या बाबींवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री पाटणकर यांच्यासह राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, सल्लागार शिवगोंड खोत, कार्यकारणी सदस्य दत्तात्रय घाडगे, संजय पावसे, गोपाळ चौधरी, राज्य संघटनेचे संघटन सचिव विनोद पन्नासे, उपाध्यक्ष दिनेश ऊके, अधिवेशनाचे आयोजक गडचिरोली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अनिल बाळेकरमरकर व सर्व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.