| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ जानेवारी २०२५
सांगली येथे काल संपन्न झालेल्या हिंदू गर्जना सभेत भाजपच्या आजी माजी मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे व माजी कामगार तथा सांगलीचे पालक मंत्री यांच्या उपस्थितीत हिंदू गर्जना सभा संपन्न झाली. यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की "ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अजून मुल्ला" आपल्या भाषणात पुढे बोलताना राणे म्हणाले की हिंदू म्हणून आपले विचार आणि भूमिका स्पष्ट असली पाहिजे मी हिंदूंच्या मतावरच आमदार म्हणून निवडून आलो आहे. विरोधकांना हिंदू समाज एकत्र येऊन मतदान करतो आहे हे सहन होत नाही त्यामुळे ते ईव्हीएम च्या नावाने बोंब ठोकत आहेत. हिंदू समाज जागा झाला आहे त्यांच्या बळावरच मी आमदार आणि मंत्रीही झालो आहे असे नितेश राणे यावेळी म्हणाले. भारत हा हिंदू राष्ट्र आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वात प्रथम हिंदूंचे हित पाहिले जाईल असेही ते म्हणाले.
याच हिंदू गर्जना सभेत बोलताना कामगार तथा सांगलीचे माजी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले की मिरजेसारख्या मिनी पाकिस्तान मधून मी चार वेळा निवडून आलो आहे. त्यांच्या या वक्तव्याने मिरजेतील सर्व धर्मीय मतदारांचा अवमान झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. यावेळी बोलताना डॉ. खाडे म्हणाले की हिंदू राष्ट्राची गर्जना करीत केंद्र सरकार त्या दृष्टीने पावले टाकते आहे, त्याला आपली साथ हवी आहे. लोकसभेला निसटता पराभव झाला, पण विधानसभेला हिंदू समाजाने 'बटेंगे तो कटेंगे' 'एक है तो सेफ है' अशा घोषणांचे महत्त्व लक्षात घेऊन अतिशय चांगले काम केले. त्यामुळेच विधानसभेत आता विरोधकांचे किरकोळ स्थान राहिले आहे, असेही डॉ. खाडे यांनी सांगितले.
दरम्यान आपल्या परखड आणि स्फोटक वक्तव्यासाठी परिचित असलेले विद्यमान मंत्री ना. नितेश राणे आणि तोलून मापून बोलणारे माजी मंत्री डॉ. सुरेश खाडे या दोघांच्या वक्तव्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विपरीत परिणाम होतो का ? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.