| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जानेवारी २०२५
सांगलीत शाळकरी मुलांच्या वादातून चाकू बाहेर; शहराच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली
सांगली शहरात अल्पवयीन मुलांमधील हिंसक प्रवृत्तीचे प्रमाण वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच स्टँड परिसरात किरकोळ वादातून एका मोबाईल शॉपी चालकाची हत्या करण्यात आली होती. त्या घटनेचा धसका नागरिकांनी घेतला असतानाच, आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शहरातील नामांकित शाळेत नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद उफाळला. सुरुवातीला हा वाद केवळ शाब्दिक होत असला तरी, काही विद्यार्थ्यांनी थेट दप्तरातून चाकू काढत धमक्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर शाळेच्या आवारातच सायकली एकमेकांवर फेकून देण्यात आल्या. काही शिक्षकांनी हा प्रकार पाहून तातडीने हस्तक्षेप केला आणि संबंधित विद्यार्थ्यांना समज दिली. पालकांनाही बोलावून संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यात आली. मात्र, हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आलेला नाही.
शाळकरी मुलांच्या हातात हत्यारे कशी येतात ?
याच घटनेच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. अल्पवयीन मुलांना सहजपणे कोयते आणि चाकू मिळतात कसे? चार दिवसांपूर्वीच स्टँड परिसरात हत्या करणाऱ्या मुलांनी सोशल मीडियावर 'रिल्स' बनवताना कोयते आणि चाकूंचा वापर केला होता. त्या प्रकरणावर पोलिसांनी कारवाई केली असली तरी अशा घटनांना पूर्णविराम लागलेला नाही.
शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरसांगलीसारख्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरात शाळकरी मुलांमध्ये वाढत असलेली गुन्हेगारी प्रवृत्ती चिंतेचा विषय बनली आहे. पोलिस प्रशासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.शहरातील नागरिकांकडूनही या घटनांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबणे हे सामाजिक दृष्टिकोनातून धोकादायक आहे. पालक, शाळा प्रशासन आणि पोलिसांनी एकत्र येऊन या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
(सांगली शहरात घडलेल्या या घटनांबाबत स्थानिक प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.)