| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ जानेवारी २०२५
सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी GRC (नागरिक तक्रार निवारण कक्ष) तयार करून कोणती ही समस्या, कोणत्या ही विभागाची समस्या सोडविण्याची सोय केली असून, नागरिकांच्या समस्या बाबतची नोंद खुद्द मा आयुक्त घेत असतात त्याच्या आढावा आणि निर्णय देखील मुदतीत होत आहे.
कुपवाड येथील एक समस्या होती अपार्टमेंटचे सांडपाणी खुल्या जागेत सोडलेले होते. डॉ. आदित्यराज घोरपडे (पत्रकार) यांना काही नागरिकांनी या बाबत विनंती केली होती. त्यावर श्री घोरपडे यांनी फोन वरून स्वच्छता निरीक्षक यांना या बाबत माहिती देऊन सत्वर कारवाई करण्याची विनंती केली होती.
स्वच्छता निरीक्षक सिद्धांत ठोकळे आणि मुकादम श्री. प्रकाश चव्हाण यांची सत्वर दखल घेऊन जागेवर सहा आयुक्त सचिन सांगावकर यांच्यासह जाऊन संबंधितांना सूचना करून, सांडपाणी खुल्या जागेत जाणार नाही यांची खबरदारी घेण्याबाबत सूचना केली आणि संबंधितांनी तात्काळ दखल घेऊन फुटलेली पाईप दुरुस्त करून घेतली आणि समस्या संपली.
मनपा कर्तव्यदक्ष, मनपा टीम कुपवाड
ऊन असो, पावसाळा किंवा उन्हाळा. सांगलीकर झोपेत असतात त्यावेळी ही माणसं नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी घराबाहेर पडलेली असतात. लाल फितीच्या सरकारी कारभाराला अनेकजण नाके मुरडतात पण त्याला ही महापालिकेची माणसं अपवाद आहेत. शुक्रवारची सकाळ, वेळ असेल सकाळी नऊची. सांगलीवर धुक्यांची दुलई पसरली होती. अशा कडाक्याच्या थंडीत महापालिकेचे सहायक आयुक्त श्री. सचिन सागावकर साहेब, स्वच्छता निरीक्षक श्री. सिद्धांत ठोकळे आणि मुकादम श्री. प्रकाश चव्हाण यांचा ताफा आमच्याकडे आला. रात्रीच मी स्वच्छता निरीक्षक ठोकळे यांना माझ्या प्रभागातील एका सांडपाण्याच्या समस्येबाबत कॉल करून बोललो होतो. नि सकाळी सकाळीच ठोकळे यांचा कॉल आला. ते म्हणाले, आम्ही आलोय तुमच्याकडे. मला आश्चर्याचा धक्काच बसला.
इतकी कार्यतत्परता आणि कर्तव्यदक्षता प्रथमच मी पाहिली. फक्त एका कॉलवर काम मार्गी लावलेबद्दल मनपा टीम कुपवाडचे धन्यवाद. अशी प्रतिक्रिया डॉ. आदित्यराज घोरपडे (पत्रकार) यांनी व्यक्त केली आहे.