yuva MAharashtra सांगली महापालिकेत मार्चमध्ये रिक्त जागेवर भरती करण्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांचे शिष्टमंडळाला आश्वासन !

सांगली महापालिकेत मार्चमध्ये रिक्त जागेवर भरती करण्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांचे शिष्टमंडळाला आश्वासन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ जानेवारी २०२५
तांत्रिक कारणामुळे 2004 पासून रखडलेले भरती प्रक्रिया लवकरच सुरू होऊन 800 हून अधिक रिक्त पदे मार्च महिन्यात भरण्यात येतील असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी जनसुराज्य पक्षाचे समित कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे, एमआयएमचे डॉ. महेशकुमार कांबळे, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, गॅब्रियल तेवढे आदींच्या शिष्टमंडळाला दिले.

पदोन्नती बाबत निवेदन देण्यासाठी आलेल्या या शिष्टमंडळाशी बोलताना शुभम गुप्ता म्हणाले की, महापालिकेचे पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ते पूर्ण केली जाईल. त्यानंतर रिक्त होणाऱ्या जागावर मार्च महिन्यात भरती प्रक्रिया राबविले जाईल. सांगली, मिरज व कोपवाड या तिन्ही शहरांची मिळून 1998 साली महापालिका स्थापन झाली. त्यावेळी सांगली नगरपालिकेतील 1554, मिरज नगरपालिकेतील 452 व कुपवाड नगरपालिकेतील 156 कर्मचाऱ्यांचा महापालिकेत समावेश करण्यात आला. सध्या महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची मिळून 2406 पदे मंजूर आहेत. यापैकी 800 हून अधिक पदे रिक्त आहेत. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने शासनाला नवीन आकृतीबंध सादर केला होता त्याला मंजुरीही मिळाली होती परंतु तांत्रिकरणातून ही भरती प्रक्रिया रखडली. याबाबत अनेक वेळा चर्चा झाल्या, आंदोलने करण्यात येऊन, निवेदने देण्यात आली. मात्र पदोन्नतीसाठी ही प्रक्रिया रखडत गेली.


परंतु आता तिन्ही शहरांच्या वाढत्या नागरिकीकरणामुळे पदोन्नती व कर्मचारी भरती प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. 225 कर्मचाऱ्यांना यावेळी पदोन्नती दिली जाणार असून त्यानंतर रिक्त झालेल्या द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील साडेचारशे ते पाचशे कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. असे शुभम गुप्ता यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. 

दरम्यान वाढीव घरपट्टी बाबत शिष्टमंडळाने आयुक्त गुप्ता यांच्याशी चर्चा केली. ज्यांनी वाढीव घरपट्टी बाबत हरकती दाखल केले आहेत त्यावर सुनावणी घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल असे गुप्ता यांनी सांगितले. वाढीव घरपट्टी बाबत कोणावरही कसलीही सक्ती केली जाणार नाही असेही त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. सध्या तिन्ही शहरात वाढीव घरपट्टी बाबत संभ्रमावस्था व नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करणार असल्याचेही गुप्ता म्हणाले. त्यामुळे आता पदोन्नती व भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्यांचा आशा पल्लवीत झाल्या आहेत.