yuva MAharashtra लुल्ला फाउंडेशनचे रुग्ण सेवेत पदार्पण ! जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून कौतुक !

लुल्ला फाउंडेशनचे रुग्ण सेवेत पदार्पण ! जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून कौतुक !

फोटो सौजन्य  - दै. ललकार 

सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ जानेवारी २०२५

सांगली शहरातील विविध सामाजिक उपक्रमात अत्यंत आदराने नाव घेतले जायचे ते म्हणजे, सर्वांचे डॅडी म्हणजेच स्व. तोताराम भोजराज लुल्ला. भारत पाकिस्तान फाळणीवेळी सिंध प्रांतातून विस्थापित होऊन मुंबईत आले. सुरुवातीच्या काळात रेल्वेत गोळ्या विकून, शिक्षण घेऊन कर सल्लागार त्यांनी काम सुरू केले. त्यानंतर ते सांगलीमध्ये स्थिरावले. त्यांच्यानंतर व्यावसायिक यशाची कमान उंचावण्याचे काम श्री. किशोर लुल्ला यांनी केले. सध्या अमित आणि गुंजन लुल्ला तसेच मानसी जोशी ही तिसरी पिढी कर सल्लागार क्षेत्रात कार्यरत आहे. 

डॅडींच्या स्वर्गवासानंतर त्यांच्या नावाने टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनची स्थापना होऊन सध्याची व पुढची पिढी अधिक सक्षम व विकसित व्हावी यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्य सुरू झाले. २०११ ते २०१३ या वर्षात 'सेवा' या प्रकल्पाच्या माध्यमातून समाजातील अनेक सेवाभावी संस्थाना संघटित केले. मेघालयातील मुलांसाठी हॉस्टेल उभारण्यात फाऊंडेशनचा मोठा वाटा आहे. २०१४ पासून आनंददायी शिक्षण हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन कार्य सुरू आहे. शिकू आनंदे, नमो ज्ञानाय, राज्यस्तरीय शिक्षण परिषद अशा अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी व पालक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

महाराष्ट्रातील आशा वर्कर्स, शिक्षिका आणि हजारो मुलीना मासिक पाळी व्यवस्थापन बाबतचे प्रशिक्षण, देण्यात आले. मुली व महिलांसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिरे घेण्यात येऊन आवश्यकतेनुसार औषधे देण्यात आली. आजअखेर रोटरी इंटरनॅशनलच्या २५ ग्लोबल ग्रँटना अर्थासहाय्य करण्यात आले. ज्यायोगे अनेक गरजू शाळांना आणि हॉस्पिटल्सना मदत करणे शक्य झाले. 


रुग्णांची होणारी लूट, अनेकाना न परवडणारे वैद्यकीय खर्च लक्षात घेऊन विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान व लुल्ला फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच दोन हॉस्पिटल सुरू करण्यात आली.

विवेकानंद हॉस्पिटल अभ्यंकर कॉम्प्लेक्स, हॉटेल ककून जवळ सांगली ( संपर्क- ८८५६९३९३३८) आणि पार्थ हॉस्पिटल, प्रांत कार्यालय जवळ, किल्ला भाग मिरज ( संपर्क- ९६०७०६५७६५) येथे ही सेवा सुरू झाली आहे. दोन्ही हॉस्पिटलमध्ये जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, अस्थीरोग, बालरोग, स्त्रीरोग व प्रसूती, दंत चिकित्सा हे विभाग ना नफा ना तोटा या तत्वावर कार्यरत आहेत. तसेच मोठ्या शस्त्रक्रिया किंवा शासनाच्या मोफत योजनांचा लाभ घेण्यासाठी विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान (मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, बामणोली येथे नेण्या आणण्याची सोय देखील उपलब्ध आहे. सांगली मिरजेतील गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन किशोर लुल्ला यांनी केले आहे.