yuva MAharashtra पत्रकारिता-काल - आज आणि उद्या !

पत्रकारिता-काल - आज आणि उद्या !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ जानेवारी २०२५
समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल असे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मत होते. सार्वजनिक जीवनात विचारमंथन करण्यासाठी वर्तमानपत्रासारखी मोठी शक्ति आहे. तिचा उपयोग समाज बदलासाठी होऊ शकतो, याचा बाळशास्त्री जांभेकरांना अभ्यास होता. म्हणूनच त्यांनी दर्पणला समाज परिवर्तनाचे शास्त्र व शस्त्र म्हणून वापरले. जांभेकरांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. मराठीतील पहिले संपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात दर्पण दिन साजरा करतो..

बाळशास्त्रीं जांभेकर यांचा जन्म २० फेब्रुवारी १८१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे झाला आहे.. मृत्यू १७ मे १८४६ रोजी झाला. (तीन वर्षांपुर्वी महाराष्ट्र सरकारने बाळशास्त्री जांभेकर यांचा राज्यातील महत्वाचे व्यक्तींच्या यादीत समावेश केला आहे.. त्यावेळेस अनेक कागदपत्रे धुंडाळून आणि इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करून महाराष्ट्र सरकारने २० फेब्रुवारी १८१२ रोजी आचार्य बाळशास्त्री यांचा जन्म झाल्याचे जाहीर केले.. तसा जीआर देखील काढला गेला.. राज्यातील शासकीय कार्यालयात २० फेब्रुवारी रोजी बाळशास्त्रींची जयंती साजरी केली जाते... अशी माहिती उपलब्ध झाली आहे.)

त्याकाळी समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपला देश असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे असे बाळ शास्त्रींना वाटले. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत 'दर्पण' ची सुरूवात मुंबई येथे केली.


त्याकाळी सुरु झालेल्या मुद्रणालयाचा त्यांनी समाज प्रबोधनासाठी उपयोग करुन घेतला. २५ जून १८४० साली दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, मनोरंजन, आणि समाजप्रबोधनाचा हेतू साध्य केला. 'दर्पण' मध्ये एकही जाहिरात त्यांनी छापली नाही. अगदी स्वतःचे पैसे टाकून। जवळपास आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र सुरु ठेवले. यावरुनच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा वृत्तपत्र सुरू करण्यामागील हेतू आणि तळमळ स्पष्ट होते. त्यावेळी गव्हर्नर जेम्स कार्नाक यांनी जस्टीस ऑफ पीस असा किताब देऊन बाळशास्त्रींचा गौरव केला.

वडील गंगाधरशास्त्री हे पंडित तर आई सगुणाबाई धार्मिक, त्यांचाच वारसा बाळशास्त्रींना मिळाला. कोकणांतील पोंभुर्ले या गावी जन्म आणि तद्वंतर मुंबईतील वास्तव्य, शिक्षण, शिक्षणातील अडीअडचणीवर मात केली.. बराच खडतर प्रवास बाळशास्त्री यांनी केला. १८२४ च्या सुमारास पोंभुर्ले सोडून बाळशास्त्री मुंबईत आले. इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करुन विविध विषयांचे ज्ञान मिळवून त्याचा उपयोग आपल्या समाजाला कसा होईल याकडे त्यांचा ओढा होता. अगदी क्याच्या अकराव्या वर्षी संस्कृतचे शिक्षण पूर्ण करुन जांभेकरांनी मुंबई गाठली होती.

इंग्रजीचे ज्ञान आत्मसात केले. तत्कालीन प्रमुख आठ भाषा व अनेक शास्त्रात ते पारंगत होते. त्यांची ग्रंथसंपदा पुष्कळ होती तसेच त्यांना अनेक सन्मान मिळाले होते. १८३४ साली भारतातील पहिले प्राध्यापक होण्याचा बहुमान बाळशास्त्रींना मिळाला आणि १८४५ साली ते राज्याच्या शिक्षण विभागाचे संचालक झाले. बाळशास्त्रींनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले.

ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्वाच्या वाटत. उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते.

सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून त्यांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली, विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली. यातूनच पुढे स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले. १८४० मध्येच त्यांनी दिग्दर्शन या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरुवात केली. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम पाहिले.

या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विद्वत्तेला जोड होती ती बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची, संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी, व्यतिरिक्त आठ ते दहा भाषा त्यांना येत होत्या. या भाषांसह विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र व सामान्य ज्ञान या विषयांवरही त्यांचे प्रभुत्व होते. मराठीतील वृत्तपत्रांचे जनक असा त्यांचा नावलौकिक आहे. त्याचबरोबर रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय असाही मान त्यांच्याकडे जातो. १८४५ मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. तसेच त्यांनी नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, आदी ग्रंथांची निर्मिती केली.

साधारणपणे १८३० ते १८४६ या काळात बाळशास्त्रींनी आपले योगदान देशाला दिले. या काळात समाज बहुसंख्येने निरक्षर, अंधश्रद्धाळू व अज्ञानी होता. म्हणूनच अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात, विविध क्षेत्रात त्यांनी केलेले प्रचंड कार्य मोलाचे ठरते. सहा जानेवारी रोजी दर्पण चा पहिला अंक प्रकाशित झाला. सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी आपल्या पत्रकारितेचा वापर केला. त्याचबरोबर जातीभेद निर्मूलन आणि विधवा पुनर्विवाह यालाही त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळेच त्यांचा उल्लेख आद्य समाजसुधारक असा केला जातो. १८१२ मध्ये जन्म झालेल्या बाळशास्त्री यांचे वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी १८४६ मध्ये निधन झाले.

दिलीप देशपांडे. 
जामनेर, जि. जळगांव.