सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ जानेवारी २०२५
अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी चोराने हल्ला केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सैफवर तब्बल सहा वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लिलावती रुग्णलयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर कडक सिक्युरिटी असताना देखील चोर घरात शिरला कसा? त्याला कोणी मदत केली? असं अनेक सवाल उपस्थित होत आहेत. दरम्यान, पोलिसांनी घरातील मोलकरणीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.
सैफवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांचे सात पथक कामाला लागले आहे. या पथकासह क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी घरातील तीन मदतनीस व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. यासर्वांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी एका मदतनीस महिलेबाबत खळबळजनक माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफवर हल्ला केलेला चोर त्याच्या घरातील मदतनीस महिलेला भेटण्यासाठी गेला होता. करीना कपूरच्या मदतनीस महिलेनेच चोराला घरात एन्ट्री दिली होती. तेव्हा त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यांच्यातील भांडण ऐकून सैफ जागा झाला. आणि या भांडणात तो पडल्याने त्या व्यक्तीने त्याच्यावर रागात हल्ला केला.
अभिनेता सैफ अली खान चोराने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्या लिलावती रुग्णलयात उपचार सुरु आहे. सैफवर सहा वार झाले आहेत. दोन खोलवर जखमा आहेत. त्यापैकी एक मणक्याजवळ आहे. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाद्वारे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती लिलावती डॉक्टरांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खान याच्या मुंबईतील घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता. चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केला. त्यावेळी सैफ अली खानला जाग आली. खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले. यावेळी चोरानं पकडलं जाण्याच्या भीतीनं त्याच्याकडील चाकूने सैफ अली खानवर सपासप वार केले. यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली आहे. त्याला तातडीनं मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफ जखमी झाल्यानंतर घरातील नोकरांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं.
पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळताच, त्यांनी सैफच्या घरी धाव घेत तात्काळ चौकशी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. सैफच्या आसपासच्या परिसरात दोन ते तीन सीसीटीव्ही आहे. गेटवरही सीसीटीव्ही आहेत. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे चोराचा माग घेण्यास सुरुवात केली आहे. चोरानं घरात शिरण्यापूर्वी घराची रेकी केली असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.