yuva MAharashtra एप्रिल महिन्यात उडणार, मिनी मंत्रालय व महापालिकांच्या निवडणुकीचा बार ?

एप्रिल महिन्यात उडणार, मिनी मंत्रालय व महापालिकांच्या निवडणुकीचा बार ?

फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी

सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ जानेवारी २०२५

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध दुसऱ्या फळीतील नेते व कार्यकर्त्यांना लागले आहेत. अर्थात 22 जानेवारी 2025 रोजी या संबंधातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. याच दिवशी अंतिम सुनावणी व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आणि या निकालावरच निवडणुकांचे निकाल अवलंबून आहेत. त्यामुळे इच्छुकांकडून 22 जानेवारी रोजी अंतिम सुनावणी व्हावे यासाठी देव पाण्यात घालून ठेवले आहेत.

महाराष्ट्रातील जवळपास 26 जिल्हा परिषद, 29 महानगरपालिका, तर तब्बल 257 नगरपालिका आणि 289 पंचायत समिती निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या दोन वर्षापासून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज्य आहे. नेते व कार्यकर्त्यांसह आता जनता ही या प्रशासकीय राजवटीला कंटाळली आहे. लोकशाही मार्गाने या स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपल्या मर्जीतील सदस्य निवडून येण्याची प्रतीक्षा सर्वानाच लागली आहे.


एकीकडे निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रारंभिक कामकाजात गुंतला आहे, तर दुसरीकडे राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले दिसत आहेत. लवकरच राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची घोषणा होणार आहे. त्यामुळे नेते मंडळी, जनता आणि निवडणुकीच्या धामधुमीला जुंपावे लागणार असल्याने शासकीय कर्मचारीही या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. जर 22 तारखेला सुप्रीम कोर्टात याबाबत निर्णय झाला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालाचा गुलालही उधळाला जाईल.