yuva MAharashtra महाकुंभमेळ्यात स्फोटाची जबाबदारी खलिस्तानीने स्वीकारली, मात्र शासनाकडून इन्कार, हा केवळ अपघात !

महाकुंभमेळ्यात स्फोटाची जबाबदारी खलिस्तानीने स्वीकारली, मात्र शासनाकडून इन्कार, हा केवळ अपघात !

फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
लखनऊ - दि. २३ जानेवारी २०२५

प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात झालेल्या सिलिंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या संघटनेने यासंबंधी ई-मेल काही प्रसार माध्यमांना पाठवला आहे, ज्यामध्ये हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. हा स्फोट म्हणजे मुख्यमंत्री योगींना दिलेला इशाराच आहे. ही सुरुवात आहे, असेही म्हटल्याचे वृत्तात म्हटले आहे.

कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या दुहेरी स्फोटाची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स घेते. कोणाचेही नुकसान करणे हा त्याचा मुख्य उद्देश नव्हता. जोगी (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी हा फक्त इशारा होता. पिलीभीत बनावट चकमकीत आमच्या 3 भावांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी खालसा तुमच्या अगदी जवळ आहे. ही तर सुरुवात आहे, असेही या संघटनेने ई-मेलमध्ये म्हटले आहे. या ई-मेलमध्ये फतेह सिंग बागीचे नाव लिहिले आहे. मात्र शासनाने या वृत्ताचा इन्कार केला असून हा केवळ अपघात असल्याचे म्हटले आहे.


शास्त्री पुलाजवळील सेक्टर-19 येथील गीता प्रेसच्या कॅम्पमध्ये रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास दोन सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली. यामुळे 180 तंबू जळून खाक झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता प्रेसच्या किचनमध्ये छोट्या सिलिंडरमधून चहा बनवत असताना सिलिंडर लीक होऊन आग लागली. यानंतर 2 सिलिंडरचा स्फोट झाला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या पाठवण्यात आल्या, त्यांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यावेळी अधिकाऱ्यांनी ही आगीची घटना असल्याचे म्हटले होते.