जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या सांगली जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन !
| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ जानेवारी २०२५
जैन समाज एक आदर्श आचार आणि विचारसरणी जोपासणारा, शांततेसाठी आग्रही असलेला समाज आहे. जैन समाजाकडे संघटनशक्ती असल्यामुळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक लाभ मिळण्यासाठी हे महामंडळ नक्कीच मोठ्या कार्यक्षमतेने आणि आदर्शपद्धतीने चालेल असा मला पूर्ण विश्वास आहे. असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती धोडमिसे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या जैन समाज अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या सांगली जिल्हा कार्यालय आणि फलक उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील होते. राजवाडा चौकामधील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे फलक आणि कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
आपल्या भाषणात बोलताना धोडमिसे पुढे म्हणाल्या, धार्मिक, वैचारिक आणि सैध्दांतिक अधिष्ठान असलेल्या जैन समाजाला खूप मोठी परंपरा असल्यामुळे जैन समाजाकडून इतर समाजाने खूप साऱ्या गोष्टी अनुकरण करण्यासारख्या आहेत. याची प्रचिती आणि अनुभूती मला लहानपणापासून मिळते आहे. जगा आणि जगू द्या हा विचार घेवून हा समाज सदैव अत्यंत उदाहरतेने कार्यरत असतो. त्यामुळे या महामंडळाच्या माध्यमातून समाजाचे नक्कीच विकास होईल, यासाठी आपल्या प्रयत्नांना आणि या महामंडळासाठी माझ्या सदैव शुभेच्छा असतील.
सुरूवातीला मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य, द. भा. जैन सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जि. पाटील यांनी देशातील इतर समाजापक्षा महाराष्ट्रातील जैन समाज हा मुख्यत: शेतकरी, छोटे व्यापारी असल्याचे सांगून महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा घेवून समाजातील अधिकाधिक गरजूंना जास्तीत जास्त मदत देण्याचा या महामंडळाचा प्रयत्न राहील असे सांगितले.
याप्रसंगी अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री. ललित गांधी यांनी महामंडळ स्थापन होण्यामागील प्रयत्न, मंत्रालयातील झालेल्या महामंडळाच्या दोन बैठकींमधील झालेले निर्णयांचा आढावा घेवून देशात सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला, हे जैन समाजाच्या दृष्टीने गेल्या शंभर वर्षातील हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. हे महामंडळ संपूर्ण जैन समाजासाठी आहे त्यामुळे याचा नक्कीच सर्व जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग होणार असल्याचे नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये, श्री. भालचंद्र पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील गरीब, गरजू जैन बांधवासाठी या महामंडळाची अत्यंत गरज होती ती पूर्ण झाली. त्यासाठी ललित गांधी यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या अभ्यासू धडाडीने पूर्ण वेळ ते या कार्यासाठी देतात याबद्दल मला मुळींच शंका नाही. द.भा.जैन सभेचा प्रतिनिधी या नात्याने श्री. रावसाहेब पाटील हे महामंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत यांच्याही सूचनांकडे आपण लक्ष देवून समाजाचे काम व्हावे. आपण एकत्र येवून सामंजस्याने एकमताने हातात हात घालून काम केल्यास नक्कीच समाजाचं फार मोठ काम होईल. महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने आपण सर्व समाजाला बरोबरीने घेवून जाल अशी अपेक्षा करतो. आपल्या सर्वच सकारात्मक गोष्टीला दक्षिण भारत जैन सभेचे सर्वतोपरी सहकार्य राहील.
शेवटी खजिनदार श्री. संजय शेटे यांनी आभार मानले. कार्यक्रमास काकासोा धामणे, अजित शिराळकर, सौ. कमल मिणचे, ॲड. जयंत नवले, पोपटलाल डोर्ले, अजित भंडे, स्वप्निल शहा, डॉ. देवपाल बरगाले, प्रा.बी.बी.शेंडगे, सचिन पाटील, प्रा.राहुल चौगुले, श्री. रमेश आरवाडे, महावीर खोत, अंजली कोले, संदिप हिंगणे, विनोद पाटील, प्रशांत अवधूत, प्रविण वाडकर, अनिल हवाणे, अनिता संजय पाटील, अनिता विनोद पाटील, छाया कुंभोजकर, सुनिता चौगुले, मंगल चव्हाण, वीणा आरवाडे, अविनाश पाटील, मेजर विद्याधार उपाध्ये, स्वाती कोल्हापुरे, अशोक गौंडाजे, प्रशांत गौंडाजे, अल्पसंख्यांक सांगली कार्यालयाचे व्यवस्थापक सलिम नदाफ, नासिर नदाफ, जाहिदा कुलकर्णी आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.