सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ जानेवारी २०२५
कडेगाव तालुक्यातील शिरसगाव येथील गायरान जमिनीत उषोषण करणारे माजी सरपंच संभाजी मांडके यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे संवाद साधला. येथील उपोषणकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिलं आहे. यासाठी माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची शिष्टाई कामी आली आहे. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जावून त्यांची भेट घेतली.
यावेळी आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी शिरसगाव येथे मागील सहा दिवसांपासून उपोषणास बसलेले संभाजी मांडके व आंदोलक ग्रामस्थ यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री यांचेशी सविस्तरपणे चर्चा केली व उपोषणकर्ते संभाजी मांडके यांच्याशी फोनवरून संपर्क साधून दिला. यावेळी संभाजी मांडके यांच्याशी फोनवरून बोलताना मुख्यमंत्री म्हणाले तुमचे आमदार विश्वजित यांचेशी आपल्या व ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत सविस्तरपणे चर्चा झाली आहे.मी मुख्यमंत्री तुमचा भाऊ आहे, काळजी करु नका'! सौर ऊर्जा प्रकल्पाला गायरान जमीन गेल्यामुळे गावाला गायरान शिल्लक राहत नाही यावर आपण नक्कीच मार्ग काढू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या गायरान जमिनीतील वनीकरण क्षेत्रात बेसुमार वृक्षतोड झाली आहे यावर मार्ग म्हणून वनविभागामार्फत गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करू.याशिवाय गावातील भूमिपुत्रांना या प्रकल्पात नोकरी द्यावी या मागणीबाबतही सकारात्मक निर्णय घेणार आहे.असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरसगाव येथील उपोषणकर्त्यांना फोन कॉलद्वारे आश्वासन दिलं आहे.